कुकडी प्रकल्पात चांगला पाऊस
By admin | Published: June 27, 2017 07:44 AM2017-06-27T07:44:35+5:302017-06-27T07:44:35+5:30
कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या ५ धरणांच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या ५ धरणांच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सर्व धरणे मिळून ४२७ द.ल.घ.फूट उपुयक्त पाणी आलेले आहे.
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये गेल्या आठवड्यात २.३६ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. आता आजअखेर ३.४० टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व धरणांच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आज पर्यंत ४२३ मिमी पाऊस झाला आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिली.
कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यात येडगाव, माणिकडोह, वडज , पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी ही ५ धरणे, तर आंबेगावमध्ये आंबेगाव तालुक्यात डिंभा ही धरणे आहेत. १ जूनपासून जुन्नर तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली होती. पण, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी वाढलेली नव्हती. सर्व धरणांमध्ये गेल्या आठवड्यात अवघे ६१६ द.श.घ.फूट उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध होता. दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ४२३ द.ल.घ.फूट उपुयक्त पाणीसाठा वाढला आहे. गेल्या वर्षी आज दिवसाअखेर फक्त १४५ द.ल.घ.फूट पाणीसाठा (०.४७ टक्के) उपलब्ध होता. सर्व धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असताना पिंपळगाव जोगा धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. या धरणाचा पाणीसाठा ० टक्केच आहे. मात्र, या धरणात कालचा पाऊस ७३ मिमी, तर १ जूनपासून आज अखेर १६० मिमी झाला असल्याने पाणीसाठा वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जुन्नर तालुक्यातील पाच धरणांतील उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी, तसेच १ जून २०१७ पासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे - येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये २७४ द.ल.घ.फूट (९.७९ टक्के) आहे. नव्याने ८ द.ल.घ.फुट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
रविवारी दिवसभरात ७० मि.मी.पाऊस झाला आहे, तर १ जूनपासून आजअखेर २३४ मिमी पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ४४७ द.ल.घ.फूट (४.४० टक्के) आहे, नव्याने १५५ द.ल.घ.फूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. काल दिवसभरात ९४ मिमी पाऊस झाला आहे, तर १ जूनपासून आजअखेर १५२ मिमी पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे. वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये २७ द.ल.घ.फूट (२.३४ टक्के) आहे, नव्याने ३ द.ल.घ.फूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, १ जूनपासून १५९ मिमी पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे.