बारामती तालुक्यात दूध दरवाढ आंदोलनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 04:54 PM2018-07-16T16:54:36+5:302018-07-16T17:04:39+5:30
दुधाला दरवाढ मिळावी या हेतूने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन करणाऱ्यांना दूध संकलन होऊ देऊ नये असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले.
बारामती :स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाला दरवाढ मिळावी या हेतूने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला बारामती तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक गावांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी विठ्ठलाला दुग्धाभिषेक करत आंदोलनाची घोषणा करतानाच दुधाला दरवाढ न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात बारामती तालुक्यातील सांगवी, शिरवली, खांडज, निरावागज, कांबळेश्वर, शिरशणे ,लाटे ,पणदरे येथील सर्व दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन केंद्राच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. सांगवी येथे शाळेतील विद्यार्थ्यांना व गोरगरीब कुटुंबांना दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले. सोमवार दिनांक (१६ रोजी ) सांगवी येथे कायदा सुव्यवस्था आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत बारामती तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष महेंद्र तावरे, प्रकाश तावरे, विकास शिळीमकर, व शेतकरी संघटनेच्या वतीने बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, माळेगाव दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महेंद्र तावरे म्हणाले, शासनाने दुधाचा दर २७ रुपये जाहीर केला असून तो दर दूध उत्पादकांंना मिळत नाही. आजचा दुधाचा दर प्रतिलिटर १७ ते १८ रुपये असून त्यामध्ये दिवसेंदिवस पशु खाद्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन करणाऱ्यांना दूध संकलन होऊ देऊ नये असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले.