'गुड शॉट' लघुपटातून अनुभवायला मिळणार 'काश्मिरी तरुणांच्या असुरक्षिततेचा हुंकार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 09:03 PM2021-12-27T21:03:13+5:302021-12-27T21:03:46+5:30
पुनित बालन स्टुडिओज काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या जीवनावर आधारीत 'गुड शॉट' हा लघुपट घेऊन आले आहेत
पुणे : पुनित बालन स्टुडिओजने बॉक्स ऑफिस हीट ठरलेल्या 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. आता पुनित बालन स्टुडिओज काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या जीवनावर आधारीत 'गुड शॉट' हा लघुपट घेऊन आले आहेत. नुकतेच १५ डिसेंबर रोजी शोपियानमधील चिल्लई कलान येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात हा लघुपट लाँच करण्यात आला. या शॉर्टफिल्मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 1.4 मिलियन व्ह्यूज तीन दिवसात मिळाले आहेत.
या प्रसंगी लेफ्टनंट जनरल डीपी पांडे म्हणाले, या लघुपटाबद्दल मी खूप आनंदी आहे. हा लघुपट काश्मीर खोऱ्यातील असुरक्षित जीवन जगणाऱ्या तरुणांवर आधारीत आहे. ज्यांची दिशाभूल ही ‘व्हाईट कॉलर टेररिस्ट’ द्वारे केली जाण्याची सदैव भीती असते. काश्मीर खोऱ्यातील तरुणांमधील संगीत प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमासाठी मी पुनित बालन आणि रुफी खान यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो.
पुनित बालन हे सामाजिक उपक्रम, पुणे शहरातील सांस्कृतिक उत्सव, क्रीडा, पर्यावरण व चित्रपट अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी ओळखले जातात. काश्मीर खोऱ्यात सतत होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि त्यामुळे विस्कळीत होणारे येथील जनजीवन या पार्श्वभूमीवर येथे शांतता नांदावी व अहिंसेचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने पुनित बालन स्टुडिओजच्या वतीने 'गुड शॉट' या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन शाहनवाज बकाल उर्फ रुफी खान यांनी केले आहे.
'गुड शॉट' हा लघुपट काश्मीर आणि काश्मिरी नांगरिकांच्या शांतीसाठी समर्पित आहे. हा लघुपट न्यू यॉर्क पीस फिल्म फेस्टिव्हल, इराण फिल्म फेस्टिव्हल, नजफ फिल्म फेस्टिव्हल, JIFF आदी ठिकाणी अंतराष्ट्रीय पातळीवर नावाजला गेला आहे. हा लघुपट तयार होण्यात भारतीय लष्कराचे अमूल्य सहकार्य लाभले आहे. दरम्यान, या लघुपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळाल्या बद्दल दिग्दर्शक शाहनवाज बकाल यांनी पुनित बालन आणि त्यांच्या निर्मिती संस्थेला धन्यवाद दिले असून हा लघुपट नक्कीच प्रभाव पाडेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
दरम्यान, नुकतेच पुनित बालन यांच्या इंद्राणी बालन फाऊंडेशनने लष्कराच्या सहकार्याने काश्मीर खोऱ्यात ‘आर्मी गुडविल स्कूल्स’ची स्थापना केली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये बारामुल्ला येथे अशा प्रकारच्या पहिल्या शाळेचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल डीपी पांडे, GOC चिनार कॉर्प्स यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या संपूर्ण पायाभूत सुविधा इंद्राणी बालन फाऊंडेशनने लष्कराच्या सहकार्याने उभारली आहे.
शॉर्ट फिल्म लिंक:
https://www.youtube.com/watch?v=PtOHehl3_Q0.