‘बायफ’चे उरुळी कांचनमध्ये चांगले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:54 PM2018-09-29T23:54:44+5:302018-09-29T23:55:02+5:30
केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांचे प्रतिपादन : भू्रणप्रत्यारोपण प्रयोगशाळेचे उद्घाटन
उरुळी कांचन : शेतकऱ्याला स्वत:च्या पायावर उभा करणे हे गांधीजींचे स्वप्न मणिभाई देसाई यांच्या प्रेरणेतून आणि बायफच्या माध्यमातून उरुळी कांचनसारख्या गावातून होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. केंद्र सरकार सर्वोतोपरी सहकार्य देण्यास कटिबद्ध आहे, असे उद्गार केंद्रीय कृषी व शेतकरी विकास मंत्री राधामोहन सिंग यांनी काढले.
बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठानच्या भ्रूणप्रत्यारोपण प्रयोगशाळेचे उद्घाटन राधामोहन सिंग यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सिंग पुढे म्हणाले की, ‘केंद्र सरकारच्या सुमारे ५ कोटी रुपये अनुदानातून ही प्रयोगशाळा उभारली आहे. प्रयोगशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात देशी गाईंच्या पैदाशीत उत्तम प्रतीच्या जनुकीय घटकांनी समृद्ध भ्रूण प्रत्यारोपण करता येणार आहेत. गुजरातमध्ये अमूल दुधाचा ब्रॅन्ड प्रसिद्ध झाला तसेच कर्नाटक राज्यात नंदिनी दूध हा ब्रँड प्रसिध्द झाला पण महाराष्ट्रात अनेक ब्रँड प्रचलित झाले. दूध उत्पादकात एकी झाली नाही ही अतिशय खेदाची बाब आहे.’
महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जानकर म्हणाले की, ‘पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. तसेच, पशुधन संवर्धन कार्यक्रमात राज्यात पुणे व औरंगाबाद या ठिकाणी दोन संशोधन केंद्र उभारणीचे काम चालू असून त्याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे.’राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप , बायफ अनुसंधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश सोहनी, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अशोक पांडे, संशोधक संचालक डॉ.जयंत खडसे, कार्यक्रम संचालक विजय देशपांडे, मनोहर कांचन, नंदकुमार पंडित यांच्यासह शेतकरी व कामगार वर्ग उपस्थित होता.
शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायात मदत करण्याच्या भूमिकेतून असे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रथमदर्शनी जवळपास ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राधामोहन सिंग,
केंद्रीय कृषी व शेतकरी विकास मंत्री