मुक्या जीवांना उन्हाचा डंख

By admin | Published: May 12, 2015 04:28 AM2015-05-12T04:28:50+5:302015-05-12T04:28:50+5:30

उन्हाचा तडाखा वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. मानवाप्रमाणे पक्षी आणि प्राणीही त्यास अपवाद नाहीत. खाद्य आणि पाण्याअभावी पक्ष्यांची

Goodbye to the hot dogs | मुक्या जीवांना उन्हाचा डंख

मुक्या जीवांना उन्हाचा डंख

Next

पुणे : उन्हाचा तडाखा वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. मानवाप्रमाणे पक्षी आणि प्राणीही त्यास अपवाद नाहीत. खाद्य आणि पाण्याअभावी पक्ष्यांची तर तडफड होत आहे. नागरिकांनी भूतदया दाखविण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. घराबाहेर, अंगणात, खिडकीत, गॅलरीत पक्ष्यांसाठी खाद्य आणि पाणी ठेवल्यास पक्ष्यांना ‘घास’ मिळून उन्हाळ्याच्या झळा काहीशा सुसह्य होतील.
गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या झळा वाढतच आहेत. सकाळपासून उन्हाचे चटके बसत आहेत. दुपारनंतर तर घराबाहेर पाऊल ठेवणे अवघड झाले आहे. असह्य परिस्थितीत रहदारी तुरळक दिसून येऊ लागली आहे. काही भागांत तर दुपारी रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळते. कडक उन्हामुळे नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. पक्षी, प्राणी यांची तर अवस्था अधिक बिकट आहे. चारा आणि पाण्याच्या शोधार्थ त्यांची भटकंती सुरू आहे. एरवी मानवी आश्रयास न येणारे पक्षी- चिमणी, कावळा, कबुतर, पारवा अन्नपाण्याच्या शोधात घराच्या गॅलरीत प्रवेश करू लागले आहेत. एरवी विद्युत खांबाच्या तारेवर जमणारा थवा, वृक्षवेलीवर भिरभिरणारे पक्षी यांचा किलबिलाट आता घराच्या अंगणात ऐकू येऊ लागला आहे. अर्थातच, त्यांना जाणवणाऱ्या भीषण उन्हाळ्यात ते चारापाण्याच्या शोधार्थ थेट घराच्या अंगणापर्यंत येऊ लागले आहेत. या मुक्या जीवांना पाहुणचाराची गरज आहे. ती भागवण्यासाठी घराच्या खिडकीत, गॅलरीत अंगणातील झाडाजवळ भिरभिरणाऱ्या या मुक्या जीवांसाठी पाणी, खाद्यान्न ठेवा, असे सांगण्याची वेळ आली आहे.
शहर आणि उपनगरात शेकडो पक्षी वास्तव्यास आहेत. चिमणी, कावळा, पारवे, कोकिळा, साळुंकी, टिटव्या, घार, घुबड, ससाणा, वटवाघूळ या जातींच्या असंख्य पक्ष्यांचे दर्शन होते. सकाळी व संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येतो. सध्याच्या तीव्र उन्हाळी वातावरणात या पक्ष्यांची अवस्था तर बिकट होते.
अन्नानासाठी बाहेर पडल्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. उन्हात अन्न आणि पाण्यासाठी भटकावे लागते. असह्य उन्हामुळे असंख्य पक्ष्यांचा होरपळून व तडफडून मृत्यू होतो. पक्ष्यांची ही तडफड नागरिक रोखू शकतात. यासाठी नागरिकांनी घराबाहेर, खिडकीत, गॅलरीत, अंगणात पाण्याचे छोटे भांडे ठेवावे. दुसऱ्या भांड्यात धान्य ठेवावे.
पक्ष्यांना सहज पोहोचता येईल, अशा ठिकाणी खाद्य व पाणी ठेवावे. खाद्यामध्ये पाणी मिसळणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यामुळे पक्ष्यांना सहजपणे खाद्य आणि पाणी उपलब्ध होईल. आपल्या परिसरात पक्ष्यांचे वास्तव्य वाढेल. याच पद्धतीने दुकानदार, विक्रेते, टपरीवाले पक्ष्यांच्या घासाची सोय करू शकतील. (प्रतिनिधी)

Web Title: Goodbye to the hot dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.