दोन-दोन दिवस माल पडून; शेतकऱ्यांना भाव मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:21+5:302021-07-01T04:09:21+5:30
कोरोना निर्बंधांमुळे परिणाम : भाजीपाल्याची आवक २०-२५ टक्क्यांनी घटली पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे पुन्हा निर्बंध ...
कोरोना निर्बंधांमुळे परिणाम : भाजीपाल्याची आवक २०-२५ टक्क्यांनी घटली
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे पुन्हा निर्बंध घातले आहेत. सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मार्केट यार्ड सुरू राहते. भाजीपाल्याच्या खरेदीसाठी जास्त करून सायंकाळच्या वेळेत नोकरदार जास्त येतात. मात्र, निर्बंधांमुळे ते मार्केट यार्डात फिरकतदेखील नाहीत. दोन-दोन दिवस भाजीपाला विकला जात नसल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. त्यामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत मार्केट सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.
कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटमुळे प्रशासनाने पुन्हा निर्बंध वाढवले आहे. तरकारी विभागात भाजीपाल्याची आवक २०-२५ टक्क्यांनी घटली आहे. वेळ कमी केल्यामुळे नोकरदार वर्ग मार्केट यार्डात फिरकत नाही, तर ढाबे आणि हॉटेलमध्ये दुपारी ४ नंतर केवळ पार्सल सुविधा असल्याने त्याचाही भाजीपाला विक्रीवर थेट परिणाम झाला आहे.
परिणामी अडत्यांच्या गाळ्यावर दोन-दोन दिवस माल विकला जात नाही. भेंडी, हिरवी वांगी, निळी वांगी, दोडका आणि पावट्याचे दर पडले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
-----
कोट
मार्केट यार्डातील मुख्य ग्राहक हा हॉटेल, खानावळ विक्रेते जास्त आहेत. सध्या अनेक खानावळीचे व्यवसाय कमी झाले आहेत. तर निर्बंधांमुळे हॉटेलला कमी ग्राहक आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे नुकतेच हॉटेल उघडण्यास वेळ वाढवला होता. आता तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे पुन्हा हॉटेलची वेळ कमी केली आहे.
- अमोल घुले, उपाध्यक्ष, आडते असोसिएशन, मार्केट यार्ड