तीन वर्षांपासून फरार असलेला गुंड बाळा दराडे अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 02:43 PM2021-04-01T14:43:40+5:302021-04-01T14:44:13+5:30
बारामती पोलिसांनी नाशिकमधून घेतले ताब्यात
बारामती: गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला व पन्नास हजार रुपयांचे बक्षिस असलेला गुंड बाळा दराडे याला अखेर बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. नाशिक मध्ये बारामती तालुका पोलिसांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
दराडे याने पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दहशत माजवली होती. पिस्तुलांची तस्करी करून युवकांना गुन्हेगारी क्षेत्रात आणण्याचा उद्योग तो गेल्या काही वर्षांपासून करत होता. त्यामुळे दराडे गँग या भागात दहशत निर्माण झाली होती. एमआयडीसीतल्या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना धमकावून खंडणी वसूल करणे याशिवाय चोरी, दरोडा, मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आणि भिगवण परिसरात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. मात्र कोणत्याही गुन्ह्यात त्याला अद्याप अटक झालेली नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना चकमा देत तो राज्यात विविध भागात लपून राहत होता.
अखेर बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गव्हाण यांना गुंड बाळा दराडे नाशिक मध्ये एकाच्या मदतीने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ढवाण यांच्यासह विशेष गुन्हे शोध पथकाचे प्रमुख योगेश लंगोटे आणि त्यांच्या साथीदारांना नाशिकला रवाना करत दराडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून फरार असल्याने पोलिस अधीक्षकांनी दराडे याच्यावर ५० हजार रुपयांचे इनाम देखील घोषित केले होते. अखेर बारामती तालुका पोलीसांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी फत्ते केली आहे. या कामगिरीत पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, पोलीस कर्मचारी विजय पांढरे, विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे यांनी सहभाग घेतला होता.