‘शक्तिप्रदर्शना’वरून गुंड शरद मोहोळला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:19 AM2021-02-18T04:19:49+5:302021-02-18T04:19:49+5:30
पुणे : प्रजासत्ताकदिनी झालेल्या एका कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन करीत दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या चार साथीदारांची ...
पुणे : प्रजासत्ताकदिनी झालेल्या एका कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन करीत दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या चार साथीदारांची बुधवारी (दि. १७) जामिनावर मुक्तता करण्यात आली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांनी हा आदेश दिला. मोहोळला एका संघटनेच्या पुरस्कार कार्यक्रमासाठी २६ जानेवारीला बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमास मोहोळ आणि त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. या शक्तिप्रदर्शन प्रकरणी मोहोळ आणि गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३८), विश्वास बाजीराव मनेरे (वय ३७), मनोज चंद्रकांत पवार (वय ४२), स्वप्नील अरुण नाईक (वय ३५) आणि योगेश भालचंद्र (वय ४०) या पाच जणांना खडक पोलिसांनी अटक केली होती. अक्षय भालेराव, सीताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मोहोळला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
संबंधित कार्यक्रमाला येताना मोहोळ आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार पेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली. त्याठिकाणी एकत्रित येऊन गैरकृत्य करण्याचा त्यांचा उद्देश होता का, याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गुन्ह्यात वापरलेली वाहने आरोपींकडून जप्त करायची आहेत. या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायची असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी खडक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे यांनी केली. सरकारच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी युक्तिवाद केला.
आरोपींच्या वतीने अमोल ढमाले, ॲड. मनीष पाडेकर, ॲड. संजय साळुंखे आणि ॲड. अश्विनी खंडाळे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता केली.
चौकट
कोण आहे शरद मोहोळ?
शरद मोहोळ या गुंडाची दहशत असून त्याची टोळी आहे. तो येरवडा तुरुंगात असताना अंडा सेलमधील संशयित दहशतवादी कातिल सिद्दिकीचा नाडीने गळा आवळून खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता. पंधरा दिवसांपूर्वीच त्याची सिद्दिकी खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यावेळी गजा मारणेप्रमाणेच रस्त्यावर शक्तिप्रदर्शन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली.