चाकण मार्केटयार्डात गुंडांचा धुमाकूळ, ५ जण जखमी; शेतकऱ्यांसह हमाल-व्यापाऱ्यांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 07:43 PM2024-06-13T19:43:18+5:302024-06-13T19:44:22+5:30

हल्लेखोरांनी मार्केटमध्ये असलेल्या अडते, हमाल, मापाडी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना घातक हत्याराने जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला....

Goons rampage in Chakan marketyard, five injured; Attack on director along with farmers | चाकण मार्केटयार्डात गुंडांचा धुमाकूळ, ५ जण जखमी; शेतकऱ्यांसह हमाल-व्यापाऱ्यांवर हल्ला

चाकण मार्केटयार्डात गुंडांचा धुमाकूळ, ५ जण जखमी; शेतकऱ्यांसह हमाल-व्यापाऱ्यांवर हल्ला

चाकण (पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी (दि. १२) मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत अनोळखी गुंडांनी दहशतीचा प्रचंड थरार करीत हातात कोयते, दांडकी घेऊन धुमाकूळ घातला. यावेळी हल्लेखोरांनी मार्केटमध्ये असलेल्या अडते, हमाल, मापाडी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना घातक हत्याराने जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान काही अनोळखी हल्लेखोर रिक्षात बसून आले होते. त्यांनी रिक्षातून उतरताच अडत्यांना गाळे बंद करा, लगतच्या नागरिकांना दारे बंद करण्याची धमकी दिली. सोबत आणलेल्या घातक हत्यारांनी बाजारातील शेतकरी, हमाल, अडते, मापाडी व व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चार ते पाच जण जखमी झाले. जखमींची नावे अद्याप समजली नाहीत. जखमींना अधिक उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, बाजार समितीच्या आवारात घडलेल्या हल्ल्याची खातरजमा करण्यासाठी आलेल्या बाजार समितीच्या एका संचालकाला संबंधित हल्लेखोरांनी शिवीगाळ-दमदाटी करीत मारहाण केली. यामुळे चाकण मार्केटयार्डमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्केटयार्डमध्ये येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांना आवारात येणास मज्जाव घालावा, तसेच बेकायदेशीर रिक्षांना आतमध्ये घेऊ नये, अशी मागणी संतप्त अडत्यांनी बाजार समितीकडे केली आहे. यापूर्वी ही अशा धक्कादायक घटना बाजार समितीच्या आवारात घडूनही बाजार समितीचे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप अडते असोसिएशनने केला आहे.

मध्यरात्रीच्या गंभीर मारहाणीच्या घटनेनंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास बाजार समितीच्या वतीने कुणीही आले नसल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित पाच ते सहा हल्लेखोरांना गुरुवारी सकाळी सोडून दिले. सोडण्यात आलेल्या त्याच गुंडांनी पुन्हा चाकण मार्केटमध्ये येऊन दहशतीचा थरार करीत संचालक आणि नागरिकांना जबर मारहाण केली. त्यामुळे चाकण बाजारात तणावपूर्ण वातावरण असले, तरी सध्या शांतता आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र हरिभाऊ गोरे यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांच्या फिर्यादीवरून सहा जणांवर जबरी मारहाण, खंडणी, दहशत निर्माण करणे विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण मार्केटयार्डमध्ये घडलेल्या गंभीर घटनेची दखल पोलिसांनी घ्यावी. संबंधित हल्लेखोरांना तातडीने ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करावी. मार्केटयार्डमधील अडते, शेतकरी आणि व्यापारी यांना संरक्षणासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा.

- दिलीप मोहिते पाटील, आमदार, खेड तालुका.

चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे, खंडणीखोर आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल. चाकण बाजार समितीच्या आवारात घडलेल्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तीन जणांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या गुन्हेगारांवर चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण पोलिस ठाणे.

 

Web Title: Goons rampage in Chakan marketyard, five injured; Attack on director along with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.