लोहगावात गुंडांनी फोडली २० ते २५ वाहने, अल्पवयीनासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 09:15 AM2023-11-08T09:15:02+5:302023-11-08T09:15:34+5:30

यात १४ रिक्षा, ५ कार तसेच इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे...

Goons smashed 20 to 25 vehicles in Lohgaon, case registered against three including a minor | लोहगावात गुंडांनी फोडली २० ते २५ वाहने, अल्पवयीनासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

लोहगावात गुंडांनी फोडली २० ते २५ वाहने, अल्पवयीनासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : ‘हमारे बीच कोई आया तो उसे छोडेंगे नही,’ असे धमकावत अल्पवयीनांसह तिघांनी लोहगाव परिसरात २० ते २५ वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवली. रविवारी रात्रीच्या सुमारास येथील कलवड वस्ती, पानसरे वस्ती आणि खेसेगाव पार्क भागात ही घटना घडली. यावेळी गुंडांनी धारदार कोयत्याने रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या वाहनांना लक्ष्य केले. यात १४ रिक्षा, ५ कार तसेच इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक तर दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. हशीम खलील शेख (१८, रा. कलवडवस्ती, लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत इनायत अली शौकत अली अन्सारी (२७, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अन्सारी हे कलवडवस्ती भागात राहण्यास आहेत. रविवारी मध्यरात्री तिघे जण दुचाकीवरून कलवडवस्ती भागात आले. त्यांनी कोयता तसेच सत्तूरसारख्या लोखंडी धारदार हत्याराने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. सात ते आठ वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर आरोपी येथीलच पानसरे वस्ती भागात गेले. तेथेही त्यांनी कोयत्याच्या साहाय्याने तोडफोड करीत पाच रिक्षा, एक कार आणि एका टेम्पोचे नुकसान केले. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी खेसे पार्क भागात जाऊन पाच ते सात वाहनांची तोडफोड केली. येथील नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. आरोपींनी नशेच्या भरात हे कृत्य केल्याचे समजले. मात्र, अशा प्रकारे मध्यरात्री रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची कोयत्याने तोडफोड होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी यातील आरोपींचा शोध घेऊन हशीम शेखला अटक केली, तर त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास विमानतळ पोलिस करीत आहेत.

Web Title: Goons smashed 20 to 25 vehicles in Lohgaon, case registered against three including a minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.