दारू मिळाली अन् नवऱ्याकडून फोनवर तिला शिवीगाळ,अपमान असं सगळं पुन्हा सुरु झालं...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 02:21 PM2020-05-08T14:21:37+5:302020-05-08T14:22:17+5:30
सरकारने दीड महिन्यापासून बंद असलेली दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आणि महिला वर्गाची डोकेदुखी वाढली.
युगंधर ताजणे -
पुणे : दारू पिण्याच्या सवयीमुळेच घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. लॉकडाऊन झाला आणि त्यावरील सुनावणी व्हायची राहिली. दारुड्या नवऱ्याने जगणे असह्य करून टाकले होते. एकदाचा घटस्फोट घेऊन शांतपणे जगता येईल असा विचारही केला होता. त्याला पुन्हा दारू मिळाली आणि त्याने फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली. शिवीगाळ, अर्वाच्य बोलणे, अपमान करणे हे सुरू झाले. दारुड्या नवऱ्याच्या फोनमुळे पत्नी वैतागून आपली तक्रार सांगत होती.
सरकारने दीड महिन्यापासून बंद असलेली दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आणि महिला वर्गाची डोकेदुखी वाढली. अशातच ज्यांनी दारूच्या कारणास्तव कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती त्यांना पतीदेवांनी फोन करून हैराण केले आहे. एका महिलेने दारुड्या नवऱ्याच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. व्यसनी नवऱ्यासोबत संसार करण्यास ती तयार नाही. अखेर तिने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊन मुळे त्या प्रकरणावर सुनावणी व्हायची राहिली. तोपर्यत नवरा काही संपर्कात नव्हता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नवऱ्याने दारू पिऊन फोन करण्यास सुरुवात केली. त्याचा फोन ब्लॉक केल्यावर त्याच्या मित्राच्या फोनवरून तो फोन करत होता. पत्नीलाच नव्हे तर तिच्या आईवडिलांना देखील त्याने उद्धटपणाने उत्तर दिले. यावर पत्नीने यातून सुटका कशी करून घ्यावी यासाठी कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तिला समुपदेशन केले.
याबाबत कौटूंबिक न्यायालयाचे विवाह समुपदेशक राजेंद्र ततार म्हणाले, पीडित महिलेचा फोन आल्यावर तिला त्या फोनकडे दुर्लक्ष करण्यास सांगीतले. अशावेळी काहीही प्रतिसाद न देणे, कुणाशीही न बोलणे असे सांगितले. याकामी पोलिसांची मदत घेता येईल. त्यांना सांगून नवऱ्याला समज देता येईल. यात घाबरून जाण्यासारखे काही नाही. सध्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याने पोलिसांकडून मदत मिळाल्यास तिची भीती कमी होण्यास मदत होईल.
................
दीड महिन्यात साधारण 70 हुन अधिक जणांना फोनद्वारे समुपदेशन
लॉकडाऊन मध्ये कौटुंबिक तक्रारी यांचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या दीड महिन्यापासून साधारण 70 हुन अधिक जणांना फोनद्वारे समुपदेशन केले आहे. सध्या कळत नकळत एकमेकांबद्दल दुस्वास वाढत चालल्याचे अनेकांच्या बोलण्यातून दिसून आले आहे. अर्थात यात काही सकारात्मक उदाहरणे देखील आहेत. ज्यात अनेकांनी लॉकडाऊन मध्ये आपला सुसंवाद वाढवून नात्याला अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट दुस?्या बाजूला सतत एकमेकांसमोर असणा?्या नवरा बायको यांच्यातील वाद वाढत चालला आहे. मात्र यासगळ्यात घरात असणा?्या मुलांकडे दुर्लक्ष होत असून ती गोष्ट कुणी लक्षात घ्यायला तयार नाही.
- राजेंद्र ततार (विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, पुणे)