अभिजात दर्जा मिळाला; पण भाषेची लक्तरे तशीच..!
By श्रीकिशन काळे | Updated: January 4, 2025 19:01 IST2025-01-04T19:01:16+5:302025-01-04T19:01:33+5:30
विश्वास पाटील : पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

अभिजात दर्जा मिळाला; पण भाषेची लक्तरे तशीच..!
पुणे :मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण प्रत्यक्षात मराठी भाषेची लक्तरे तशीच आहेत. शहरे, गावे, खेडी, वस्त्यांमधून मराठी भाषेची विदारक वस्तुस्थिती लक्षात घेऊन, योग्य उपाययोजना करायला हव्यात, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी शनिवारी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.
सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे पुण्यात पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून, या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या हस्ते शनिवारी (दि. ४) झाले. त्या वेळी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून विश्वास पाटील बोलत होते.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी सुरुवात झाली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजीव बर्वे, मधुमिता बर्वे, रोटरीचे प्रांतपाल शीतल शहा, रागिणी शहा, उपप्रांतपाल मोहन पालेशा, अभय गाडगीळ, यजमान क्लब अध्यक्ष सूर्यकांत वझे आदी व्यासपीठावर होते.
विश्वास पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात मराठी भाषेच्या परंपरेचा आढावा घेत आणि बुजुर्ग लेखकांची उदाहरणे देत मराठी भाषेच्या वास्तवाचे दर्शन घडवले. ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांनी ‘मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी भीक मागते आहे आणि तिच्या अंगावर लक्तरे आहेत’, असे विधान केले होते.
त्याचा संदर्भ देत पाटील यांनी, मराठी भाषेच्या अंगावरील लक्तरे अद्यापही तशीच आहेत, अशी टीका केली. ‘अभिजात दर्जा मिळाला म्हणून लगेच मराठी समृद्ध झाली, असे नाही. मराठीच्या समृद्धीसाठी आधी खेड्यातून, गावांतून शाळा, ग्रंथालयांमधून प्रयत्न झाले पाहिजेत. तिथे दयनीय अवस्था आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. ग्रंथपालांना लाजिरवाणे मानधन दिले जाते. मराठी भाषेतील ग्रंथव्यवहार चिंताजनक आहे. साहित्याचा आवाज हा मानवी आत्म्याचा आवाज असतो आणि भाषेच्या माध्यमातून तो अभिव्यक्त होतो. ती भाषा जपली पाहिजे, वाढली पाहिजे, व्यवहारात आली पाहिजे, ज्ञानभाषा झाली पाहिजे.’
चंदू बोर्डे म्हणाले, ‘रोटरीने या संमेलनाच्या निमित्ताने भाषा, साहित्य, संस्कृतीच्या विश्वातही नवी दिशा देणारे, प्रेरक आणि नव्या पिढीला भाषेकडे आकर्षित करणारे काम करावे.’ यावेळी रोटेरियन आणि लेखक म्हणून उत्तम योगदान देणाऱ्या डाॅ. दीपक शिकारपूर, सुधीर राशिंगकर आणि अभिजित जोग यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कविता अभ्यंकर यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.