धनगर आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:41 AM2017-08-08T02:41:33+5:302017-08-08T02:41:33+5:30
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे. आरक्षण देताना कोणत्याही त्रुटी राहू नये, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे. आरक्षण देताना कोणत्याही त्रुटी राहू नये, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
बारामती येथे अभिकाका देवकाते मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९२व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
बापट म्हणाले, की भाजपा सरकारच्या माध्यमातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. कायद्याच्या पातळीवर आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी टाटाज् इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस या संस्थेमार्फत अहवाल देण्याचे काम सुरू आहे.
भाजपा प्रवक्ते गणेश हाके म्हणाले, की धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. धनगर समाजाला दिलेले आश्वासन मी पाळणार आहे, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची ढोलताशाच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने बारामती दुमदुमली.
आयोजक भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश सचिव अभिजित देवकाते यांनी प्रास्तविक केले.
या वेळी बारामती शहर व तालुक्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजित देवकाते यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माळेगावचे संचालक अविनाश गोफणे, डिस्टिलरीचे चेअरमन अविनाश देवकाते, रासपचे प्रदेश कोषाध्यक्ष किशोर मासाळ, अविनाश मोटे, शशिकांत तरंगे, गणपत देवकाते, सुरेश कांबळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण आटोळे, प्रशांत सातव, लखन चव्हाण, संदीप चोपडे, हेमलता पांढरमिसे, कल्याणी वाघमोडे, आशा देवकाते आदी या वेळी उपस्थित होते. कुमार देवकाते यांनी सूत्रसंचालन केले.