सरकार दरबारी कोणत्याही कामासाठी पेपर नाचवावे लागतात; प्रशांत दामलेंची खंत
By श्रीकिशन काळे | Published: July 1, 2023 05:45 PM2023-07-01T17:45:26+5:302023-07-01T17:46:00+5:30
सरकार दरबारी पेपर नाचवावे लागतात तरच काहीतरी मान्य होते, फक्त संवाद साधून काहीही मिळत नाही
पुणे: कोविड नंतर नाटकांना चांगले दिवस येत आहेत, तरीही मराठी नाटकांना प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून मराठी नाटकांना समृद्ध करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व नाट्यकलावंतप्रशांत दामले यांनी व्यक्त केले. सरकार दरबारी कोणत्याही कामासाठी पेपर नाचवावे लागतात, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखेतर्फे प्रशांत दामले यांचा शनिवारी पत्रकार संघात सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना दामले बोलत होते. पुणेरी पगडी घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दामले यांनी रंगभूमीवर नाटकांचे १२ हजार पाचशे प्रयोग पूर्ण केल्याबद्दल १२ हजार पाचशे रूपयाच्या देणगीचा धनादेश त्यांना देण्यात आला. याप्रसंगी नाटककार सतिश आळेकर, सुनील महाजन आदी उपस्थित होते.
दामले म्हणाले, राज्यातील नाट्यगृहांची अवस्था जरी बिकट असली तरी आगामी काळात सर्व नाट्यगृह सुस्थितीत करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी राज्यभरात नाट्यगृहांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रेक्षकांना दर्जेदार नाटक पाहता यावे, यासाठी नाट्य दिग्दर्शक विविधांगी कलाकृती निर्माण करत आहेत. अद्ययावत नाट्यगृह राहावे यासाठी संबंधित प्रशासन असो वा सरकार दरबारी पेपर नाचवावे लागतात, तरच काहीतरी मान्य होते. फक्त संवाद साधून काहीही मिळत नाही. पण त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात, अशी खंतही दामले यांनी व्यक्त केली.