पुण्याच्या पिण्याच्या पाण्यातील प्रदुषणाबाबत सरकार उदासीन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 10:00 PM2020-03-02T22:00:00+5:302020-03-02T22:00:01+5:30
स्थानिक बडे लोक व बांधकाम व्यावसायिकांचे हे संगनमत
पुणे : खडकवासला धरणाच्या भोवतालची गावे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या अखत्यारित येतात. धरणातप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कारवाई करून ते रोखण्याची जबाबदारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची असते. मात्र या दोन्ही यंत्रणा खडकवासल्यातील मैलापाण्याचे प्रदूषण थांबवण्याबाबत उदासीनच असल्याचे दिसले आहे.
पुण्याला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या खडकवासला धरणाभोवती गोऱ्हे खुर्द, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, खानापूर, गिरीनगर, ओसाडे, कडजे, मांडवी, सांगरून, गावकोस अशी अनेक गावे आहेत. ही बहुतेक गावे पीएमआरडीएच्या अखत्यारित आहेत. सांडपाणी, मैलापाणी व्यवस्थापनाचा आराखडा दिल्याशिवाय या गावांमधल्या कोणत्याही बांधकामाला परवानगी देता येत नाही. मात्र तरीही या गावांमध्ये अनेक निवासी, व्यावसायिक इमारतींना ‘पीएमआरडीए’ने परवानगी दिली आहे.या सर्व इमारतींचे मैलापाणी धरणात मिसळत आहे. मात्र त्याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. काही जणांनी शोष खड्यांमध्ये सांडपाणी जिरवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र तेही अंतिमत: धरणाच्या प्रदूषणाचे कारण ठरत आहे. बांधकामाची परवानगी मिळवताना सादर केलेल्या तरतुदींची पूर्तता केली नसल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार पीएमआरडीएला आहेत. मात्र अशीही कारवाई या कार्यालयाने केलेली नाही. धरणात दूषित पाणी सोडले जात आहे, म्हणून कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही. बांधकामाच्या परवानग्या मात्र सर्रास दिल्या जात आहेत.सार्वजनिक उपयोगाचे पाणी प्रदूषणाविरोधात संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत.
पुण्यातील त्यांच्या कार्यालयातून दिवसभरात कोणीही दूरध्वनी घेतला नाही, मात्र या खात्यानेही कधीच खडकवासला परिसरात तपासणी केली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. धरणात दूषित पाणी सोडणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडून स्थानिकांना धमकावले जाते. स्थानिक बडे लोक व बांधकाम व्यावसायिकांचे हे संगनमत आहे. गावांतील मृतांचे अंत्यसंस्कारही धरणाच्या बाजूलाच केले जातात. अन्य धार्मिक विधींचे निर्माल्यही थेट धरणात टाकले जात असल्याचे येत असल्याचे या नागरिकांनी सांगितले.