शासनाने कमिटमेंट पाळली नाही, निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: February 20, 2024 03:09 PM2024-02-20T15:09:17+5:302024-02-20T15:09:28+5:30
यामध्ये ससूनमधील निवासी डाॅक्टरांची संघटना (मार्ड) देखील सहभागी हाेणार आहे, असे बीजेएमसी मार्ड चे अध्यक्ष डाॅ. निखिल गटटानी यांनी दिली....
पुणे : राज्य शासनाने राज्यातील निवासी डाॅक्टरांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणून ससूनसह राज्यातील सर्वच शासकीय वैदयकीय महाविदयालयातील डाॅक्टर येत्या गुरुवारी संपावर जाणार असल्याचा इशारा प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे. यामध्ये ससूनमधील निवासी डाॅक्टरांची संघटना (मार्ड) देखील सहभागी हाेणार आहे, असे बीजेएमसी मार्ड चे अध्यक्ष डाॅ. निखिल गटटानी यांनी दिली.
राज्यातील मध्यवर्ती मार्ड संघटनेने याआधी संपाचा इशारा दिला हाेता. त्यावेळी नियोजित संप सुरु करण्याच्या आधीच ७ फेब्रुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात राज्यातील निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) मागण्यांसंदर्भात बैठक झाली.
त्यावेळी, विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्याबरोबरच दर महिन्याच्या ठरावीक तारखेला नियमितपणे वेतन देण्याची ग्वाही देण्यात आली होती. तसेच वसतिगृह तातडीने दुरुस्त करणार असल्याचे डॉक्टरांना या वेळी सांगितले होते. मात्र हे आश्वासन देऊन सुद्धा पाळले गेले नसल्याचे निवासी डॉक्टर सांगत असून त्यामुळे पुन्हा एकदा संपाचे हत्यार त्यांनी उपसले आहे.