शेतक-यांबाबत सरकार दुटप्पी - रघुनाथ पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 06:32 AM2018-03-09T06:32:38+5:302018-03-09T06:32:38+5:30
शेतकरी आठवडेबाजार अनधिकृत ठरवून शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेला महापालिका पाठिंबा देत आहे. आठवडेबाजार ही संकल्पना बंद करून शेतकºयांच्या मुलांचा रोजगार बंद करण्याचा घाट घातला जात आहे.
बाणेर - शेतकरी आठवडेबाजार अनधिकृत ठरवून शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेला महापालिका पाठिंबा देत आहे. आठवडेबाजार ही संकल्पना बंद करून शेतकºयांच्या मुलांचा रोजगार बंद करण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री शेतकºयांच्या पोरांनी नोकरीकडे न वळता, व्यवसाय करण्याची भाषा करतात आणि पणन विभाग शेतकºयांच्या आठवडेबाजाराला वेळेवर परवानगी देत नाही, हे दुट्टपी धोरण शेतकरीविरोधी आहे, अशी टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली.
बालेवाडी येथे पालिकेच्या रिकाम्या जागेत ३ वर्षे सुरू असलेला शेतकरी बाजार बंद करण्यासाठी नोटीस देऊन अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. कारवाईच्या विरोधात आज (दि. ८) शेतकरी संघटना, शेतकरी गट व नागरिक रस्त्यावर उतरले होते. बालेवाडी येथील दसरा चौकात कारवाईसाठी आलेल्या प्रशासनाच्या कर्मचाºयांना विरोध दर्शवण्यात आला. यानंतर विविध शेतकरी गटांच्या शेतकºयांनी आपला माल रस्त्याच्या कडेला मांडून भाजीबाजार भरवला. या प्रसंगी रघुनाथ पाटील या ठिकाणी आले होते.
बालेवाडी येथील पालिकेच्या रिकाम्या जागेत चालू असलेल्या गुरुवारच्या शेतकरी बाजाराला ५ मार्च रोजी पालिकेने कारवाईची नोटीस दिली होती. याविरोधात शेतकºयांनी शासनाच्या आठवडेबाजारानुसार परवानगी मागीतली असल्याचे सांगितले; परंतु शासन विलंब करीत आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली.
बालेवाडी येथील ४० सोसायट्यांमधील नागरिकांनी आठवडेबाजार सुरू ठेवण्यासाठी लेखी पाठिंबा दिला आहे. बालेवाडी गावठाण व लक्ष्मीमाता मंदिर परिसरातील सोसायट्या यांना जवळ असणारा हा आठवडेबाजार आहे. या आठवडेबाजारात थेट शेतकºयांकडून ग्राहकांकडे भाजी, फळभाज्या विक्रीसाठी येतात. ३ वर्षे सुरू असलेला बाजार अचानक बंद करण्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त याच परिसरात आणखी एक आठवडेबाजार सुरू झाला आहे. यामुळे बालेवाडी गावाजवळील जुना आठवडेबाजार बंद करण्यासाठी कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यात ४८ शेतकरी बाजार सुरू आहेत. आठवड्यातून काही तास भाजीविक्री करण्यात येते. शासनाच्या जून २०१४ च्या संकल्पनेनुसार पणन विभागाच्या सूचना पाळून आठवडेबाजारात शेतकरी भाजीपाला विक्री करतात; परंतु पालिका अधिकारी अनधिकृत विक्रेत्यांच्यावर कारवाई न करता आठवडेबाजार बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. - नरेंद्र पवार, स्वामीसमर्थ शेतकरी गट
१ पाटील म्हणाले की, शेतकरी जगवण्यासाठी शासन खरंच धोरण राबवत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन अपयशी ठरत आहे. शेतकºयांच्या मागण्या पूर्ण होत नाही. यातून शेतकरी आपला माल शहरात घेऊन आला, तर त्याला तो विकला जाऊ देत नाही. शेतकरी आठवडेबाजारात अफू, मटका, गांज्याची विक्री होत नाही. मग, हे बाजार अनधिकृत का ? ठरवले जात आहे. मुख्यमंत्री विधानसभेच्या आवारात आठवडेबाजार भरवत असतील, तर पुण्यात मोकळ्या जागेत भरवले जाणारे अठवडेबाजार अनधिकृत कशासाठी ठरवले जात आहेत. शहरातील व्यापरी व अनधिकृत विक्रेते यांच्याशी हातमिळवणी करून पालिका अधिकारी कारवाईचा घाट घालत आहे.
२ आठवडे बाजार संयोजक लहू बालवडकर म्हणाले की, तीन वर्षे शेतकरी आठवडेबाजार वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा रितीने पालिकेच्या मोकळ्या जागेत सुरू आहे. शेतकºयांना व्यापारी ठरवून शेतकºयाचा माल ग्राहकांना मिळू नये यासाठी पालिकेचे काही अधिकारी हाताशी धरून कारवाई केली जात आहे.