सरकारकडे १ रुपया द्यायला नाही अन् लाडकी बहीण योजना; ही तर निवडणुकीची स्टंटबाजी - अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:19 PM2024-09-30T12:19:28+5:302024-09-30T12:19:59+5:30
लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी सरकारने इतर योजनांचा निधी वळविला असून, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार करायला सरकारकडे पैसा राहणार नाही
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून निवडणुकीचा स्टंटबाजी केली जात आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडकी योजना बंद करण्यात आली आहे, तर राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे. एक रुपया सरकारकडे द्यायला नाही. सरकारने या योजनेअंतर्गत आधी प्रत्येकी पंधराशे रुपयाचे दोन हप्ते पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले होते. तर तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी ४६ हजार कोटींची तरतूद यासाठी राज्य सरकारने केली. मात्र लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी सरकारने इतर योजनांचा निधी वळविला असून, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार करायला सरकारकडे पैसा राहणार नाही, अशी टीका यावेळी व्यक्त करीत आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार असून, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विश्वास व्यक्त केला. पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे माध्यमाशी संवाद साधताना ते बोलत होते.
मेट्रो उद्घाटन किती वेळा करणार ?
देशाचे पंतप्रधान यांनी उद्घाटन करणे चांगले आहे, पण किती वेळा हे स्टेशन, ते स्टेशनचे उद्घाटन म्हणजे हा पोरखेळ आहे. पंतप्रधान ही स्वस्त करून टाकले असून, राजकीय स्टंट करणे हा एवढाच भाजपचा प्रोजेक्ट आहे. जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात. मेट्रो राहिली एका बाजूला शो बाजीमध्ये भाजपला जास्त इंटरेस्ट दिसत आहे.
महाराष्ट्रात गुन्हेगारीचे राज्य
बदलापूरमधील घटेनेतील मुख्य आरोपी लपवण्यासाठी अक्षय शिंदेचा एनकाउंटर करण्यात आला. त्या संस्थेचे आपटे कुठे आहेत? खरा आरोपी लपविण्यासाठी एनकाउंटर केला आहे, तर उद्योग मंत्र्यांचा मोबाइल हरवतो, स्वतःचा मोबाइल ठेऊ शकत नाही उद्योग मंत्री, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षितेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.