सरकारला शेतकऱ्यांचं दुखणंच कळेना
By admin | Published: January 6, 2017 06:23 AM2017-01-06T06:23:25+5:302017-01-06T06:23:25+5:30
हातात पैसा खेळंना... जित्राबं बाजारात आणली तरी त्याला गिऱ्हाईक नाही... चार बाजार हिंडलं तरी जनावरं इकली जात न्हाईत...
बारामती : हातात पैसा खेळंना... जित्राबं बाजारात आणली तरी त्याला गिऱ्हाईक नाही... चार बाजार हिंडलं तरी जनावरं इकली जात न्हाईत... शेतकऱ्याच्या हातात चलनच राहिलं न्हाई, तर तो बाजारात कसा येईल..? या सरकारला शेतकऱ्याचं दुखणंच कळंना... अशा शब्दांत बारामती येथील जनावरांच्या बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण अर्थकारण जैसे थे आहे. तरकारी, फळ, जनावरांच्या बाजारातील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. नोटाबंदीनंतर ग्रामीण परिसरात मंदीची लाट कायम आहे. जनावरांच्या किमतींमध्ये निम्म्याने घट आली आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. बारामती, काष्टी, अकलूज, राशीन आदी बाजार फिरले तरी जनावरांची विक्री होत नाही. जर्र्सी गाईंचा बाजार लाखावर गेला होता. आता हा बाजार ६० हजारांच्या खाली आला आहे. दरामध्ये ५० टक्के घट झाली आहेच; परंतु जर्सी गाईंच्या मागणीत घट झाली आहे. आठवड्याला १० गाईंची विक्री होत असे. बाजारातील या वास्तव परिस्थितीमुळे व्यापारीवर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ८० ते ९० हजार रुपये प्रतिजोडी असणारे खिलार बैलाचे दर आता ६० ते ६५ हजार रुपये प्रतिजोडीवर घसरले आहेत. या वेळी बाजारात धुळे येथून देशी गाई विक्रीसाठी घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांनादेखील या मंदीचा फटका बसल्याचे दिसून आले. साहिर सल्लू यांनी गीर जातीच्या चार गाई कालवडीसह विक्रीला आणल्या होत्या. ४० ते ५२ हजार रुपयांपर्यंत या गाईंच्या किमती ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, दिवसभरात त्यांच्या केवळ एका देशी गाईची विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)