सरकारला यशवंत कारखाना सुरूच करायचा नाही - आढळराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:45 AM2017-12-01T03:45:15+5:302017-12-01T03:45:47+5:30
यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांना कारखाना सुरूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला.
मांजरी : यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांना कारखाना सुरूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला.
हडपसर-मांजरी येथील विकासकामांची पाहणी करण्यासाठी ते आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक तानाजी लोणकर, विजय देशमुख, शहर उपप्रमुख समीर तुपे, दिलीप कवडे, अमित घुले, शंकर घुले, सूरज घुले आदी उपस्थित होते. मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
दीड ते दोन महिन्यांत कामाला सुरुवात होईल. महादेवनगर ते मांजरी रस्ता हा चांगल्या दर्जाचा करण्यात यावा, अशा सूचना संबंधित कंत्राटदाराला आढळराव-पाटील यांनी दिल्या. दरम्यान, आढळराव यांनी मांजरी रस्त्याच्या कामाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. पुणे-सोलापूर महामार्गावर वाहत असलेले ड्रेनेज, महामार्गाच्या पट्ट्यात आवश्यक असलेले पार्किंग आदी प्रश्न नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी लागलीच महामार्ग अभियंत्यांशी संपर्क साधून प्रश्न सोडविण्यास सांगितले.
आढळराव म्हणाले, की कारखाना चालू करण्यासाठी आम्ही आग्रही होतो; परंतु भाजपा सरकारने आम्हाला विश्वासात न घेता परस्पर कारखान्याचे प्रशासकीय मंडळ स्थापन केले. त्या प्रशासकीय मंडळात शिवसेनेच्या प्रतिनिधींपैकी एकाही व्यक्तीला संचालक म्हणून घेतले नाही. संपूर्ण संचालक मंडळात भाजपाचेच लोक घेतले आहेत. त्यातील काहींना कारखानदारीची माहितीदेखील नाही असे काही लोक त्यामध्ये निवडले. त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.
मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपुलाचे सुमारे ५० कोटी रुपयांचे काम जीएसटीमुळे लांबणीवर पडले होते. तो प्रश्न सुटल्याने आता येत्या दोन महिन्यांच्या आत हे काम सुरू होईल. महादेवनगर-मांजरी रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम वेगोने सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्या कामाचा आपण पाठपुरावा केला आहे. पूनावाला ग्रुपच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून हे काम साकारत आहे. मतदारसंघातील इतर मोठ्या गावांतील कचरा व इतर कामांच्या बाबतही पूनावाला ग्रुपशी आपली चर्चा सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत तीन-चार वेळा पालिका आयुक्तांशी चर्चा करून हडपसर मतदारसंघातील कचरा, पाणी, पालखी रस्ता, पुलांची बांधणी, वाहतूक आदी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे.
- शिवाजीराव आढळराव
खासदार