जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा
By नितीन चौधरी | Published: November 21, 2023 08:02 PM2023-11-21T20:02:59+5:302023-11-21T20:03:13+5:30
१४ डिसेंबरपासून पुकारण्यात येणाऱ्या संपाबाबत संघटनेने ८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला नोटीसही दिली आहे
पुणे: जुनी पेन्शन लागू करण्यावरून सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या १४ डिसेंबर पासून कर्मचारी पुन्हा बेमुदत संप करणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली. याबाबत जिल्हा तसेच तालुकास्तरावर सर्व कर्मचाऱ्यांच्या निर्धार सहभाग घेण्याचेही ठरविण्यात आले आहे.
काटकर यांनी मंगळवारी (दि. २१) पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची निर्धार सभा घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख सुरेंद्र सरतापे पुणे जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे कृष्णा साळवी दादा कुचेकर नंदकुमार भरे कर संध्या काजळे सुनील चोरा मले दीपक दिवार महेश घुले आधी उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप पुकारला होता. आठवडाभर चाललेल्या या संपमुळे जिल्हा प्रशासनाचे तसेच अन्य सरकारी कार्यालयांचे कामकाज जवळपास ठप्प झाले होते. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला होता. मात्र ती लागू करण्याबाबत संघटनेने राज्य सरकारला वारंवार विनंती पत्र सादर केल्यानंतरही अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नसल्याने संघटनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत १४ डिसेंबरपासून राज्यभर बेमुदत संप करण्याचे ठरविले आहे.
पुण्यात झालेल्या या निर्धार सभेत काटकर यांनी संपाच्या पूर्वतयारीबाबत पदाधिकाऱ्यांना अवगत केले. संपानंतर राज्य सरकारने नेमलेल्या त्री सदस्यीय समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने अद्याप मंजूर केलेला नसल्याने पेन्शन लागू करण्यासंदर्भात स्पष्टता दिसत नसल्याचे काटकर म्हणाले. १४ डिसेंबरपासून पुकारण्यात येणाऱ्या संपाबाबत संघटनेने ८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला नोटीसही दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्य पाच राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन लागू करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र तसे न झाल्यास संघटनेने संपाचा पवित्रा कायम ठेवला आहे.