राजद्रोहाच्या गुन्ह्याचे गांभीर्यच सरकारने संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:20+5:302021-03-04T04:20:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राजद्रोहाचा गुन्हा अतिशय गंभीर असतो. तो कोणावरही कोणत्याही कारणासाठी दाखल करून केंद्र सरकारने या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजद्रोहाचा गुन्हा अतिशय गंभीर असतो. तो कोणावरही कोणत्याही कारणासाठी दाखल करून केंद्र सरकारने या गुन्ह्याचे गांभीर्यच संपवले आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब मारणे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त शहरातील ५ ज्येष्ठ काँग्रेसजनांचा गौरव देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. राजीव गांधी स्मारक समिती व गोपाळ तिवारी मित्र मंडळाच्या वतीने संभाजी पुलाजवळच्या विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम झाला. माजी खासदार अशोक मोहोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मधुकर सणस, भगवान धुमाळ, रामचंद्र्र उर्फ भाऊ शेडगे, शेखर बर्वे, बुवा नलावडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहन जोशी व रमेश बागवे यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी आमदार उल्हास पवार, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप उपस्थित होते.
देसाई म्हणाले, नेहरू गांधी यांचे देशाच्या जडणघडणीतील योगदान फार मोठे आहे. त्यांचे नाव पुसून टाकण्यास निघालेले, त्यांच्यावर टीका करणारे विद्वेषाने पछाडलेले आहेत. मोहोळ यांनी तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या जगाला सामोरे जाणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी काँग्रेसने निर्माण करावी असे सांगितले. गोपाळ तिवारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बाळासाहेब मारणे, शेखर बर्वे,भगवान धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर यांची भाषणे झाली. कामगार नेते राजेंद्र खराडे यांनी आभार मानले.