सत्ताधा-यांना आपल्या शब्दाचा विसर : सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:49 PM2018-08-21T14:49:06+5:302018-08-21T14:52:06+5:30
बुलेट ट्रेनकरिताचे पैसे अंगणवाडी सेविकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, कुपोषण मुक्तीसाठी वापरणे अधिक योग्य ठरले असते.
पुणे : अंगणवाडी सेविकांना रोजगार हमीपेक्षा देखील कमी पगार मिळतो. त्याचप्रकारे अनेक वर्ष कष्ट करून त्यांना हक्काचे पैसे मिळत नाही. अंगणवाडी सेविकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सत्ताधा-यांनी याविषयी आश्वासने देवून ती पूर्ण केली नाहीत. त्यांना त्यांच्या शब्दाचा विसर पडल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली.
निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष पुंडलीक पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. पी. जे. कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष रमेश पिसे, मावळ अध्यक्ष शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, बुलेट ट्रेनला विरोध नाही. देशाच्या ज्याठिकाणी पूर्ण विकास झालेला आहे तिथे ती करावी. आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या असताना त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. बुलेट ट्रेनकरिताचे पैसे अंगणवाडी सेविकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, कुपोषण मुक्तीसाठी वापरणे अधिक योग्य ठरले असते. त्यामुळे कुपोषण मुक्त महाराष्ट्र झाला तर जास्त आवडेल. निवृत्त कर्मचा-यांनी आपल्या व्यथा सुळे यांच्यासमोर मांडल्या. कैद्यांपेक्षा कमी खर्च हे सरकार आमच्यावर करत असल्याची खंत एका कर्मचा-याने व्यक्त केली.