सरकारला सामान्यांचा विसर
By admin | Published: October 15, 2015 01:03 AM2015-10-15T01:03:12+5:302015-10-15T01:03:12+5:30
देशात मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. सामान्य माणसालाही जगण्याचा हक्क आहे, याचा सरकारला विसर पडलेला दिसतो
पुणे : देशात मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. सामान्य माणसालाही जगण्याचा हक्क आहे, याचा सरकारला विसर पडलेला दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण १२५ कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे सांगतात. त्यात मुस्लिमांचा समावेश नाही का, असा सवाल मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांनी केला.
सय्यदभाई यांनी सामाजिक ध्रुवीकरणाचा निषेध करून ‘दगडावरची पेरणी’ या साहित्यकृतीसाठी मिळालेला न. चिं. केळकर पुरस्कार मानधनाच्या रकमेसह परत पाठविला आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतीय मुस्लिमांनाही जगण्याचा समान अधिकार आहे. या समाजाची सगळीकडून कुचंबणा होत आहे. सध्या देश जातीय दंगलींनी पोखरून निघाला आहे. मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून गेली ५० वर्षे मी विवेकवादाचे, सुधारणांचे कार्य करीत आहे. मात्र, या कार्यालाच आव्हान देणाऱ्या घटनांमुळे व्यथित होऊन मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
समाजात धर्मांधता वाढत चालली आहे. या विदारक परिस्थितीबाबत सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने पुरस्कार परत करणार असल्याचे लोकशाहीर संभाजी भगत यांनी सांगितले. त्यांना ‘नागरिक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.