Vinayak Mete: सरकारला शेतकऱ्यांची नाही; नवाब मलिकांचा जावई अन् आर्यन खानची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 07:30 PM2021-10-31T19:30:25+5:302021-10-31T19:35:12+5:30
शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कोणी गेले नाही ना त्यांच्या सांत्वनासाठी नेते फिरकले
पुणे : शेतकरी रोज आत्महत्या करताहेत. एकट्या बीड जिल्ह्यांत आतापर्यंत १६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ७० ते ७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंदच नाही. शेतकऱ्यांची लेकरं म्हणवून घेणाऱ्यासाठी ही लाज आणणारी बाब आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कोणी गेले नाही ना त्यांच्या सांत्वनासाठी नेते फिरकले. राज्य सरकरला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही. सरकारला केवळ नवाब मलिकांच्या जावई व आर्यन खानच्या चिंता असल्याची टिका शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी केली. राज्यातील विविध प्रश्ना संदर्भात रविवारी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
''राज्य सरकारने शेतकऱ्यांची चेष्ठा लावली आहे. मुर्दाड मनाचं सरकार आहे.त्यांना याची लाज देखील वाटत नाही. दिवाळीत जर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही तर दिवाळी नंतर शिवसंग्राम च्य वतीने सरकार मोर्चा काढला जाईल. तो बीड मधून काढला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.''
छत्रपतीं शिवरायांचे स्मारक उभारायला वेळ नाही
''फडणवीस सरकारचा काळात शेतकरी आत्महत्या कमी होत होत्या. मदत देखील तत्काळ दीली जात होती.पण ठाकरे सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील गंभीर नाही. दोन महिने उलटून गेले सरकारने साधी बैठंक देखील घेतली नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय दयायचा नाही. ठाकरे सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार सर्व विषयावर बोलतात. त्यांना केवळ मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलायला वेळ नाही. मराठा समाजाचं आंदोलन शांत झालेले नाही. मागासवर्ग आयोगाला पैशाची कमतरता नाही. निवडणुका जवळ आल्याकी ठाकरे सरकारला शिवाजी महाराज आठवतात. शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागणाऱ्या सरकारला छत्रपतीं शिवरायांचे स्मारक उभारायला वेळ नाही.''
शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार
''शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार आहे. मात्र किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणच्या लढवायच्या, कोणासोबत जायचं याबाबत अदयाप कोणता निर्णय घेतला नाही. नंतर लवकरच सर्व स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. सध्या सरकारला राज्यात कोणता प्रश्न च नाही असे वाटते. आर्यन खान व समीर वानखडे ह्या प्रश्नातच सरकारला स्वारस्य आहे. ह्या प्रकरणांत जे सुरु आहे.ते खूप खालच्या पातळीवरचं लक्षण आहे असेही ते यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेस शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, बाळासाहेब चव्हाण, आदी उपस्थित होते.''