सरकारने बलुतेदारांना, लोककलावंतांना एक रुपयाही मदत केली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:29+5:302021-05-22T04:09:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाची पहिली लाट ओसरून दुसरी आली, आता तिसरी लाटही येण्याची शक्यता आहे. यामध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाची पहिली लाट ओसरून दुसरी आली, आता तिसरी लाटही येण्याची शक्यता आहे. यामध्ये गेल्या दीड वर्षापासून आम्ही राज्य सरकारकडे सातत्याने मागणी करत आहोत की, हातावर पोट असणाऱ्या असंघटित कामगारांपैकी बारा बलुतेदारांना मदत करा. पण गेल्या दीड वर्षात एका रुपयाचीही मदत सरकारने केली नसल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुकुल माधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या माध्यमातून पाटील यांच्या हस्ते लोककलावंताना शिधावाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुल माधव फाउंडेशनचे जितेंद्र जाधव, योगेश रोकडे, नगरसेविका आणि शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजूश्री खर्डेकर, पुणे शहर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, स्वीकृत सदस्य ॲड. मिताली सावळेकर, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रतीक खर्डेकर आदी उपस्थित होते.
राज्यात मुख्यमंत्री दुसरा लॉकडाऊन लागू करत होते, तेव्हाही आमची या वर्गासाठी आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली होती. पण सरकारने काय दिलं. राजा उदार झाल्याप्रमाणे फक्त १५०० रुपयाची मदत केली. एवढ्या मदतीत एखाद्या कुटुंब तरी कसे चालेल, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. कोरोनाचे संकट अजून किती काळ चालेल, हे कुणालाच माहीत नाही. मात्र याचा सामना करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला नेहमी तत्पर राहिलं पाहिजे.
लोककलावंत प्रदीप कांबळे यांनी आपली व्यथा मांडली. गेल्या दीड वर्षामध्ये एकही कार्यक्रम न झाल्याने एक रुपयाची देखील कमाई झाली नाही. त्यातच कोरोनामुळे आर्थिक खर्चाचा भार देखील पडला. राज्य सरकारकडून अद्याप काहीही मदत झाली नाही. त्यामुळे शासनदरबारी आम्हा लोक कलावंतांची व्यथा मांडून, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
संदीप खर्डेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक केले. मंजूश्री खर्डेकर यांनी आभार मानले, तर मुकुल माधव फाऊंडेशनचे जितेंद्र जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.