शासकीय ग्रंथालयातील साहित्य राज्यात सर्वत्र उपलब्ध करून देणार : डॉ. सदानंद मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:08 AM2021-07-26T04:08:57+5:302021-07-26T04:08:57+5:30
पुणे: भाषा आणि संस्कृती हा केवळ सरकारचा किंवा मंडळाचा नाही, तर समाजातील प्रत्येकाचा विषय आहे, त्यामुळे यापुढील काळात ...
पुणे: भाषा आणि संस्कृती हा केवळ सरकारचा किंवा मंडळाचा नाही, तर समाजातील प्रत्येकाचा विषय आहे, त्यामुळे यापुढील काळात शासकीय ग्रंथालयात मिळणारी विविध पुस्तकं आणि साहित्य आता राज्यात सर्वत्र उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि शनिवारवाडा कला महोत्सव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते डॉ. मोरे, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आणि लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेचे (आर.अँड. डी. ई) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा सत्कार करण्यात आला.
आजचा सत्कार हा माझा घरचा सत्कार आहे, याचा नक्कीच आनंद आहे, अशी भावना डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. यापूर्वी राज्यातील पाच जिल्ह्यांत पुस्तके उपलब्ध होत असत. पण आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
आजचा सत्कार म्हणजे आजवर केलेल्या कामाची पावती आहे. शस्त्रास्त्रविषयक संशोधन आणि निर्मिती क्षेत्रातील कृती दलामध्ये काम करताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सहवासाचा परीसस्पर्श लाभला. त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, अशी भावना कुरुलकर यांनी व्यक्त केली. तर विश्वकोशातील ज्ञान समाजात सर्वत्र पोहोचविण्यावर भर देण्यात येणार असून, कुमार कोश समृद्ध करण्याकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे, असे दीक्षित यांनी सांगितले.
डॉ. देगलूरकर यांनी आज शक्ती, भक्ती, इतिहास या क्षेत्राचा सत्कार होत आहे. ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले.
सध्याच्या काळात चिंतन करुन अभ्यासू वृतीने काम करण्याची मानसिकता कमी प्रमाणात जाणवते. आजच्या सत्कारामुळे ही मानसिकता सकारात्मक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
शनिवारवाडा कला महोत्सवाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विजय काळे यांनी प्रास्ताविक केले. भांडारकर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आभार मानले, तर संस्थेचे निबंधक श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले.
---------------------------------