"सरकारला पाडायला ताकद लागते..! जयंत पाटलांनी ते करून दाखवावं" - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 01:46 PM2022-11-06T13:46:02+5:302022-11-06T13:50:42+5:30
भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे
पुणे : एखादा विषय मार्गी लागेपर्यंत थांबलो नाही हा आमचा संघर्ष आहे. असा संघर्ष करून अजित पवार आमरण उपोषणाला बसले ते बघणं महाराष्ट्राला आवडेल. जयंत पाटील यांनी म्हणत रहावं सरकार पडेल म्हणून. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं असे आव्हान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे. गेले अडीच वर्षे आम्ही संघर्ष केला. सरकारला झोपू दिलं नाही. वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचा संघर्ष डीएनएच नाहीये. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं.
अंधेरी निवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणी कोणावर काय आरोप करायचे यावर बंधन आणता येत नाही. अंधेरीमध्ये लोकांची मानसिकता काय आहे कळत नाही. त्यामुळे लोकांचं मी सांगू शकत नाही. नोटाला का मतदान झालं कळत नाही.
जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल
नाना पटोले यांना लोक गांभीर्याने घेत नाहीये. पुण्यात नियोजन बैठकीमध्ये आमच्यावेळी विरोधी आमदारांना कमी निधी देऊन तोंडाला पाणी पुसले होते. त्यामुळे मी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आणि सुनील शेळके यांचे निधी कमी केले. पण त्यांचेही अंदाजपत्रक सेव्ह करायला सांगितले आहे. जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल. कारण आमची सत्ता आली, निधी तर द्यावा लागेल. 'मातोश्री' किंवा 'वर्षा'मध्ये जाऊन कोणी सभा घेऊ शकत नाही. त्यामुळे अंगणात घ्यायला काय हरकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.