पाबळ येथील मस्तानीच्या ऐतिहासिक स्मृती स्थळाकडे शासनाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:53 PM2020-01-09T18:53:03+5:302020-01-09T19:08:50+5:30
मस्तानीची कबर व परिसर त्याचबरोबर गढीची जागा पाहून त्यांनी खंत व्यक्त
शिक्रापूर : पाबळ येथील ऐतिहासिक मस्तानीच्या स्मृतिस्थळाची इंदूर, भोपाळ व सिहोर येथे सध्या वास्तव्यास असणाऱ्या मस्तानीच्या वंशजांनी भेट देऊन पाहणी केली. मस्तानीच्या सातव्या, आठव्या व नवव्या पिढीतील वंशज यावेळी उपस्थित होते.
मस्तानीची कबर व परिसर त्याचबरोबर गढीची जागा पाहून त्यांनी खंत व्यक्त करून मस्तानीची गढी व कबर ही मराठा इतिहास व साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा असून ही स्मारके जतन करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने जास्तीत जास्त प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे या वंशजांनी सांगितले. पुणे येथे ‘मस्तानी जीवन शोध’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर मस्तानीचे सातवे, आठवे व नववे वंशज आपल्या कुटुंबीयांसह पाबळ येथे आले होते.
रावेरखेडी (मध्य प्रदेश) येथे मध्य प्रदेश पर्यटन विभागाने उत्कृष्ट काम करीत या परिसराचा विकास केला आहे. मात्र, पाबळ येथील मस्तानीचे ऐतिहासिक इमारतीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या ऐतिहासिक गावाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला पाहिजे. पाबळ ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून उदयाला आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. या वेळी मस्तानीचे वंशज फिरोज सुलतान, तमकीन अली बहादूर, जुबेर बहादूर जोश, बहादूर जुनेद, अली बहादूर अलमास, सुलतान सना, अली बहादूर इरफान, अली बहादूर असलाम, तस्किन अली बहादूर, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड, बाजीराव मस्तानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय डहाळे, संचालक चंद्रशेखर वारघडे, धनंजय गावडे, प्रशांत मैड, उपसरपंच संजय चौधरी, सरपंच पल्लवी डहाळे, माजी सरपंच शारदा चौधरी, रंजना डहाळे, अविनाश क्षीरसागर, प्राचार्य डॉ. संजय घोडेकर आदी उपस्थित होते.
.........
ग्रामस्थांनी मूळ वस्तूंची छायाचित्रे दाखवत माहिती दिली. येथील परिस्थिती बघून झालेल्या कामाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत स्मृतिस्थळाचे मूळ स्वरूप परत निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ‘लोकमत’शी बोलताना जुबेर बहादूर जोश यांनी, स्थानिक मस्तानी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हे ऐतिहासिक ठिकाण चांगल्याप्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे सांगितले