'सरकारला पूरस्थितीचं गांभीर्य नाही; मुख्यमंत्री, पालकमंत्री जागावाटपाच्या बैठकीसाठी दिल्लीत व्यस्त'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 11:03 AM2019-09-26T11:03:30+5:302019-09-26T11:11:16+5:30
पुण्यात पूरामुळे माणसं मेली तरी भाजपाचे मंत्री निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत
पुणे - शहर आणि परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक ठिकाणी एनडीआरएफचे जवान लोकांना वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत. पुण्यात इतकी भयंकर स्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री दिल्लीला युतीच्या बैठकीसाठी गेलेले आहेत. सरकारला पूरस्थितीचं गांभीर्य नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारचा कारभार रामभरोसे चालला आहे. लोकांच्या प्रश्नांची यांना काही देणंघेणं नाही. पुण्यात पूरामुळे माणसं मेली तरी भाजपाचे मंत्री निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. कोल्हापूर-सांगली येथे पूर आला होता त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न होते तर आता पुण्यात पूर आलेला असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दिल्लीला युतीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी गेले आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
तसेच पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी घटनास्थळी असणं गरजेचे होते. मात्र निवडणूक महत्वाची असल्याने जनतेकडे दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारला जनतेचं कोणतंही सोयरसुतक नाही अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
तर प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच मृतदेह मिळून आले असून, अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफच्या तीन पथकांकडून सुरू होते. टांगेवाले कॉलनी ही टांगे चालवणाऱ्यांची कॉलनी आहे. ही कॉलनी नेमकी नाल्याला खेटून आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर नाल्याचे पाणी वाढले. अक्षरशः रौद्र रूपाने वाहणारे पाणी कॉलनीतील घरांमध्ये घुसले. भिंती खचल्याने येथील काही घरे पडली. अंगावर भिंती पडल्याने काही जणांच्या मृत्यू झाला. तर काही जण प्रवाहासोबत वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात मृत्यू झालेल्यांप्रती ट्विटरवरुन दु:खं व्यक्त केलं आहे. राज्य सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. पुणे आणि बारामतीला एनडीआरएफ टीम रवाना केल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
2 NDRF teams are deployed in Pune & 2 in Baramati.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 26, 2019
One more NDRF team is on way to Baramati.
State Government is also closely monitoring the dam discharge.