जिल्ह्यातील शेततळ्यांचे सरकारकडे सव्वादोन कोटी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:13 AM2021-09-14T04:13:42+5:302021-09-14T04:13:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील शेततळ्यांचे २ कोटी ३४ लाख रुपये सरकारकडे थकीत आहेत. योजना बंद झाल्याने अनुदानाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील शेततळ्यांचे २ कोटी ३४ लाख रुपये सरकारकडे थकीत आहेत. योजना बंद झाल्याने अनुदानाचे हे पैसे मिळतील की नाही? याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
जिल्ह्यात शेततळे योजनेंतर्गत आतापर्यंत ४ हजार ३५९ शेततळी झाली आहेत. शेततळी सपाट जमिनीवर होत असल्याने सर्वाधिक शेततळी इंदापूर (११४८), पुरंदर (११३२), बारामती (७७७), शिरूर (५६५) या भागात झाली आहेत. खेड (२६९), आंबेगाव (१०९), जुन्नर (३०१), भोर (५२), मावळ (१२), मुळशी (१४) या भागात तुलनेने कमी शेततळी आहेत.
शेतामध्ये ३० बाय ३० मीटर व ३ मीटर खोल असे तळे तयार केल्यास त्यासाठी ५० हजार रुपये अनुदान देणारी योजना सरकारने राबवली. त्यामध्ये जिल्ह्यात ४ हजार ३७९ शेततळी झाली. त्यासाठी सरकारने १७ कोटी ७२ लाख अनुदान दिले. २ कोटी ३४ लाख रुपयांचे अनुदान सरकारने देणे बाकी आहे. त्याची मागणी होत आहे.
दरम्यान, सरकारने आता ही योजनाच बंद केली आहे. त्यामुळे की काय थकीत अनुदानाच्या मागणीकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी अनुदानाच्या अपेक्षेने स्वतःच्या शेतीतील जागेचा वापर करून स्वखर्चातून तळे तयार केले. मात्र, आता अनुदानच अडकल्याने व त्यातही योजनेला टाळे लागल्याने तळे खोदून ठेवलेले शेतकरी चिंतेत पडले आहेत.---///
----------------
आम्ही थकीत अनुदानाची मागणी प्रस्ताव पाठवून केली आहे. या आर्थिक वर्षात अनुदानाची रक्कम सरकारकडून निश्चितपणे मिळेल. शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही.
- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक