घरेलू कामगार मंडळासाठी सरकार सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:46+5:302021-08-15T04:13:46+5:30
पुणे : घरेलू कामगार कल्याण मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच या अनुषंगाने केलेल्या ...
पुणे : घरेलू कामगार कल्याण मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच या अनुषंगाने केलेल्या जिल्हा दौऱ्याचा अहवाल देणार आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील घरेलू कामगार महिलांची अवस्था बिकट आहे. त्यांच्या व एकूणच असंघटीत क्षेत्रातील महिला कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला, त्यावेळी ही बाब प्रकर्षाने जाणवली. कोरोना निर्बंधात सरकारने त्यांना मदत केली, पण त्याशिवाय त्यांना आणखी मोठा मदतीचा कायमस्वरूपी हात मिळायला हवा.
त्यादृष्टीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर चर्चा झाली आहे, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. मुश्रीफ त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य घेत आहेत. मंडळाचे कामकाज सध्या फक्त कामगार आयुक्त कार्यालयात घरेलू कामगार महिलांची नोंद करून घेण्याइतके मर्यादित झाले आहे. या नोंदीही संबधितांना जिल्हा दौऱ्यात आदेश दिल्याने सुरू झाल्या आहेत, असे डॉ. गोऱ्हे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.