खासगी प्रयोगशाळांच्या मनमानीला सरकारचा चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:38+5:302021-04-05T04:10:38+5:30
राजगुरुनगर : कोरोना चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांनी अव्वाच्या सव्वा दर आकारण्यास सुरुवात केली आहे. साधारण एक हजार ५०० ते ...
राजगुरुनगर : कोरोना चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांनी अव्वाच्या सव्वा दर आकारण्यास सुरुवात केली आहे. साधारण एक हजार ५०० ते एक हजार ८०० दर आकारण्यात येत होता. मात्र, आता शासनाने खासगी प्रयोगशाळांच्या मनमानीला चाप लावला आहे. कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले आहे. यामुळे आता नागरिकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
शासन निर्णयानुसार कोविड चाचणीसाठी आता आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये दर निश्चित केले आहे. प्रयोगशाळा केंद्रावरुन नमुना घेऊन वाहतूक आणि अहवाल देणे यासाठी ५०० रुपये, कोविड सेंटर, रुग्णालय, क्वारांटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमुना चाचणी आणि अहवालासाठी ६०० रुपये, तर रुग्णांच्या निवासस्थानावरून चाचणी घेऊन अहवाल देण्यासाठी ८०० रुपये आकारण्याचे निर्देश शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केले आहेत.
आरटीपीसीआर चाचणीसोबत रॅपीड अँटिजेन, ॲटीबाॅडीज या चाचण्यांसाठी संशयित बाधित स्वतः प्रयोगशाळेत आल्यास २५० रुपये, तपासणी केंद्रावर अथवा एकत्रित नमुने घेतल्यास ३०० रुपये, तर घरी जाऊन चाचणी घेतल्यास ४०० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहे.सीएल आय ए फाँर सार्स कोविड अँटीबाँडीज चाचणीसाठी अनुक्रमे ३५० रुपये, ४५० रुपये, ५५० रुपये तर रॅपीड अँटिजेन चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळेत १५० रुपये ,२०० रुपये आणि ३०० रुपये दर निश्चित केले असले तरी याबाबत ग्रामीण शहरी भागातील अनेक नागरिक आपल्या ओळखीचा अथवा फॅमिली डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील तपासणी करण्यास खासगी प्रयोगशाळेत जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक साखळीच तयार होत असल्याचे दिसते.
खेड तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळांसाठी कोविड चाचणीचे तीन टप्प्यांत दर आकारणी निश्चित केले आहे. नियमबाह्य दर आकारणी होत असल्यास चाचणी केल्याबाबत बिलाची पावती मागणी करावी. प्रयोगशाळांनी बिल देणे बंधनकारक आहे. याबाबत कोणतीही तक्रार असेल तर नागरिकांनी खेड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार दाखल करावी. तक्रारीची वेळेत दखल घेतली जाईल.
विक्रांत चव्हाण
उपविभागीय अधिकारी खेड