आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलकांच्या आत्महत्येला शासन जबाबदार; मनोज जरांगे पाटलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 03:16 PM2023-10-20T15:16:13+5:302023-10-20T15:16:53+5:30
शांततेचे आंदोलन मोडण्याची ताकद राज्यातील व केंद्रातील कोणत्याही शक्तीत नाही, जारांगे पाटलांचा इशारा
जुन्नर : आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांचे मुडदे पडायला लागले, त्यांच्या आत्महत्या व्हायला लागले ,याला शासन जबाबदार आहे असा आरोप करतानाच आरक्षण देण्यासाठी सुरू झालेले हे शांततेचे आंदोलन मोडण्याची ताकद राज्यातील व केंद्रातील कोणत्याही शक्तीत नाही असा इशारा मराठा समाज आरक्षनासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा समाज गाठीभेटी या दौऱ्याअंतर्गत किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले असताना जुन्नर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
जरांगे पाटील म्हणाले, शासनाने मराठा समाजाला समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 24 तारखे नंतर शांततेत आंदोलन होणार आहे. परंतु हे शांततेचे आंदोलन शासनाला पेलनारे नाही हे मी शिवनेरी गडावरून जाहीर करतो. शासनाने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आमचे आजोबा ,पनजोबा ,खापर पनजोबा ,पूर्वज कुणबी होते .त्यांचे आम्ही रक्ताचे वंशज आहोत .शेतीला ते कुणबी असे म्हणायचे आता सुधारित शब्द शेती असा आला आहे. त्यावेळी त्यावेळी शेती करणाऱ्याला कुणबी असे म्हणत आम्ही सर्व कुणबीच आहोत. आम्हाला दोन प्रकारचे अंग आहे. आम्ही क्षत्रिय लढणारे मराठा आहोत, दुसरे शेतीतच पाय ठेवतो,शेतीत असतो,देशाला अन्नधान्य पुरवतो.
मराठा समाजाचे प्रेरणा केंद्र किल्ले शिवनेरी आहे. जिजाऊंनी अन्यायाविरुद्ध लढण्यास शिकवले तसेच शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. समाजाने शांततेत आंदोलन करावे ,आत्महत्या करू नका, यापुढे समाजात जाऊन आरक्षण कशासाठी पाहिजे याची माहिती द्या असे आवाहन मनोज जरंगे पाटील यांनी केले.
जरांगे यांचे दिनांक 19 रोजी रात्री उशिरा जुन्नर येथे आगमन झाले त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषद केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 96 शहाण्णव कुळी मराठ्यांना आरक्षण देवू नये या वकतव्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी गोरगरीब समाजाचे कल्याण होणार आहे,आरक्षण ज्याला घ्यायचे तो घेईल कोणाला जोरजबरदस्ती नाही. शरद पवारांच्या बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात तुमची सभा होत आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला नाही,मराठ्यांचा बालेकिल्ला आहे, मराठ्यांचा जिल्हा आहे आहे अशी टिप्पणी जरांगे पाटील यांनी केले.