सत्तेचा मार्ग थेट दिल्ली नाही व्हाया अयोध्या : हुकूमचंद सावला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:05 PM2018-12-10T12:05:46+5:302018-12-10T12:06:44+5:30
देशातील १०० कोटी भारतवासियांची वज्रमूठ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माणाचे कार्य अशक्य आहे...
पुणे : रामजन्मभूमी हा सर्वांच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अयोध्येमध्ये राममंदिराची उभारणी करु शकते, त्याकरीता न्यायालय किंवा समाजाला विचारण्याची गरज नाही. आता देशामध्ये सत्तेत जाण्याचा मार्ग थेट दिल्ली नसून व्हाया अयोध्या आहे. त्यामुळे कॉंग्रेससह प्रत्येक पक्षाचे राजकारणी येथे येत आहेत. राष्ट्रीय चरित्र निर्मितीकरीता राममंदिर आवश्यक आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमचंदजी सावला यांनी केले.
विश्व हिंदू परिषद पुणेच्या वतीने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर निर्माणासाठी संसदेत कायदा करावा, या मागणीसाठी पुण्यात बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कागशिला पिठाधिश्वर महंत साध्वी प्रज्ञा भारतीय जी, प.पू. अतुलशास्त्री भगरे गुरुजी, दादा वेदक, पांडुरंग राऊत, रवींद्र वंजारवाडकर, सभेचे संयोजक किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ यांसह संत महात्म्य उपस्थित होते. खासदार अनिल शिरोळे यांना राममंदिर निर्माण कायद्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
साध्वी प्रज्ञा भारतीय म्हणाल्या, भारत देश स्वतंत्र झाला, नागरिक स्वतंत्र झाले, मात्र आजही रामलल्ला स्वतंत्र नाही. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर निर्माणाकरीता पुढाकार घ्यायला हवा. राज्य व केंद्र सरकारने जर ठरविले, तर मंदिर उभारणी सहज शक्य आहे. तीन तलाक सारखा कायदा न्यायालय करु शकते, मग राममंदिर निर्माणाचा कायदा का होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला.
प.पू.अतुलशास्त्री भगरे गुरुजी म्हणाले, देशातील १०० कोटी भारतवासियांची वज्रमूठ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माणाचे कार्य अशक्य आहे. सरकारच्या भरवशावर राहणे योग्य नाही. कोणाला न दुखावता राममंदिर होणार नाही. त्यामुळे मंदिर निर्मितीकरीता रामभक्तांची शक्ती एकवटली पाहिजे़
खासदार अनिल शिरोळे यांनी देखील राममंदिर उभारणीकरीता सरकार आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. धनंजय गायकवाड, नितीन महाजन, अतुल सराफ, गणेश वनारसे, नाना क्षीरसागर, केतन घोडके, श्रीपाद रामदासी आदींनी सभेच्या आयोजनात सहभाग घेतला. मंदार परळीकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तमराव उर्फ भाऊराव कुदळे यांनी प्रास्ताविक केले. किशोर चव्हाण यांनी निवेदनाचे वाचन केले. श्रीकांत चिल्लाळ यांनी आभार मानले.