गदिमा स्मारकासाठी शासनाकडून २५ लाखांचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 08:44 PM2018-10-01T20:44:46+5:302018-10-01T20:45:45+5:30
अलौकिक कर्तुत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाड.मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. तरीही महानगरपालिकेकडून दाखवण्यात आलेल्या उदासिनतेबाबत माडगूळकर कुटुंबियांनी काही महिन्यांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती.
पुणे : महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी कोथरूडमधील जागा निश्चित करण्यात आली असून गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षातच स्मारकाच्या कामास सुरुवात होणार आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीमार्फत गदिमा स्मारकासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले.
अलौकिक कर्तुत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाड.मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. तरीही महानगरपालिकेकडून दाखवण्यात आलेल्या उदासिनतेबाबत माडगूळकर कुटुंबियांनी काही महिन्यांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेऊन जन्मशताब्दी वर्षापूर्वी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गदिमा स्मारकासाठी कोथरुडमधील जागा निश्चित करण्यात आल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी ‘गदिमायन’ या कार्यक्रमादरम्यान जाहीर केले. स्मारकाचे काम यावर्षीच सुरु केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्मारकासाठी राज्य सरकारकडून शक्य तितकी मदत करावी, असे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडून २५ लाखांचा निधी मंजूर केल्याचे बापट यांनी जाहीर केले. स्मारकाचा प्रश्न मार्गी असणार असल्याबाबत माडगूळकर कुटुंबियांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
..................