शासनाकडून स्कॉलर विद्यार्थ्यांची थट्टा; परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:46 AM2018-02-13T03:46:29+5:302018-02-13T03:46:41+5:30
प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करण्यासाठी शासनाकडून महिना १०० रूपये इतकी तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे.
- दीपक जाधव
पुणे : प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करण्यासाठी शासनाकडून महिना १०० रूपये इतकी तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आलेली नाही, त्यामुळे या परीक्षेकडेच विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली असून परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत खाली घसरली आहे.
महाराष्टÑ शासनाने गुणवंत विद्यार्थ्यांना गरीब परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी १९५४ पासून ४ वी व ७ वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा घेऊन दरमहा शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा घेतली जाते.
दोन वर्षांपूर्वी या परीक्षांच्या इयत्तेमध्ये बदल करण्यात आला असून आता इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) व इयत्ता ८ वी (पूर्व माध्यमिक) च्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील (२०१७-१८) शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडत आहे. यंदा ५ वी व ८ वी या दोन्ही इयत्तांसाठी मिळून केवळ ७ लाख ८९ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. शिष्यवृत्ती देणाºया विद्यार्थ्यांची २००९ मध्ये २१ लाखांवर जाऊन पोहोचलेली संख्या कमी-कमी होत यंदाच्या वर्षी (२०१७-१८) अवघ्या ७ लाख ७९ हजारांवर जाऊन पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
दोन वह्यांसाठीच खर्च होतात १०० रुपये
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे, साध्या २ वह्यांसाठी एकावेळ शंभर रुपये खर्ची पडतात. बाकी शाळेची फी, गणवेश दप्तर, वह्या-पुस्तके, स्कूल बस हा खर्च हजारांमध्ये जातो. मात्र शासनाकडून अजूनही केवळ १०० रुपयेच शिष्यवृत्ती दिली जाते आहे. त्यामुळे ही शिष्यवृत्ती मिळविण्याचा आटापिटा करण्याची आवश्यकता विद्यार्थी व पालकांना वाटेनाशी झाली आहे.
शिष्यवृत्तीपेक्षा कोचिंग अन् पुस्तकांसाठी जास्त खर्च
शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यास प्रतिमहा १०० रुपये असे १० महिन्यांचे हजार रुपये मिळतात. मात्र पाल्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वह्या-पुस्तके, गाइड व कोचिंगसाठीच हजारो रुपये खर्च होतात. त्यामुळे या शिष्यवृत्तीचा असाही विद्यार्थ्यांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी आर्थिक मदत देणे या शिष्यवृत्तीच्या मूळ हेतूच बाजूला पडला आहे.
तुकाराम बर्गे, पालक
खर्च हजारांनी वाढला, पण शिष्यवृत्ती जैसे थे
अगदी शिशू गटातील विद्यार्थ्यांच्या शाळेची फी, गणवेश दप्तर, वह्या-पुस्तके, स्कूल बस यांचा खर्चही आज हजारांमध्ये जातो आहे. त्याचवेळी शासनाकडून मात्र ५ वी व ८ वीमध्ये लाखो विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता यादीत येणाºया स्कॉलर विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षांपासून केवळ महिना १०० रुपये इतकीच शिष्यवृत्ती दिली जाते आहे. त्यामुळे या शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्यासाठी आता पालक उत्सुक दिसून येत नाहीत. - प्रिया पवार, पालक