इंदापूर नगरपरिषदेला शासनाने अनुदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:23+5:302021-05-31T04:09:23+5:30
इंदापूर शहरात कोरोना नियंत्रण आढावा व उपाययोजना बैठकीसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या वेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा ...
इंदापूर शहरात कोरोना नियंत्रण आढावा व उपाययोजना बैठकीसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या वेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी अनुदानाची मागणी केली. या वेळी बैठकीस उपस्थित असलेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीसाठी टाळ्यांच्या कडकडाट करून प्रतिसाद दिला.
नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, इंदापूर नगरपरिषद क वर्गात मोडत असल्याने, मिळणाऱ्या उत्पन्नात घरपट्टी व पाणीपट्टी करवसुलीची रक्कम महत्त्वपूर्ण असते. यातून नगरपालिका मूलभूत आवश्यक अशा सोयीसुविधांवर खर्च करत असते. कोरोना पार्श्वभूमीमुळे व्यापारीवर्गाला लॉकडाऊन आणि मंद उलाढालीचा फटका बसला आहे. व्यापारीवर्गाच्या या प्रतिकूल परिस्थितीमुळे इंदापूर नगरपरिषदेस घरपट्टी व पाणीपट्टी वसुली होण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. या कारणाने निधीचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने पाणीपट्टी व घरपट्टी रकमेएवढे अनुदान नगरपरिषदेस द्यावे.
याबाबत तत्काळ शासनाला पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या वेळी सांगितले. तर व्यापारी वर्गाकडून देखील नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या या मागणीला प्रतिसाद मिळत असून शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.