शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:15+5:302021-05-29T04:09:15+5:30
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यामध्ये पिटकेश्वर, निमगाव केतकी, गोतंडी, शेळगांव, अंथुर्णे, हगारवाडी, शिरसाटवाडी, रणगाव, सराफवाडी, जाधववाडी, घोरपडवाडी, वरकुटे ...
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यामध्ये पिटकेश्वर, निमगाव केतकी, गोतंडी, शेळगांव, अंथुर्णे, हगारवाडी, शिरसाटवाडी, रणगाव, सराफवाडी, जाधववाडी, घोरपडवाडी, वरकुटे खुर्द आदी अनेक गावांच्या परिसरात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या कोरोनाचे संकट शेतकऱ्यांवर असल्याने शेतीपिकांना चांगला बाजारभाव मिळत नाही. त्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानाची भर पडली आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे.
त्यामुळे शासनाने शेतीपिकांचे, घरांच्या पडझडीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत तत्काळ देणे गरजेचे आहे. वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी विद्युत खांब कोसळले आहेत, अशा ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. दरम्यान, आणखी काही दिवस माॅन्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.