शासनाने दारूची दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा : महिला संघटनांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 06:25 PM2020-05-04T18:25:30+5:302020-05-04T18:25:49+5:30
शासनाचा हा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून, या निर्णयाला आमचा विरोध आहे.
पुणे : दारू पिण्याचं प्रमाण वाढलं की हिंसाही आपोआपच वाढते. दारूची दुकाने सुरू करण्याच्या या सरकारच्या निर्णयामुळे महिला अत्याचारांमध्ये वाढचं होणार आहे. त्यामुळे शासनाचा हा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून, या निर्णयाला आमचा विरोध आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महिला संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात कुटुंबियांसमवेत वेळ घालविण्याची चांगली संधी मिळाली असली तरी महिलांसाठी हा काळ म्हणजे वरदान नव्हे तर शाप चं ठरला आहे. या काळात घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत वाढ झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगाकडे 26 एप्रिलपर्यंत देशभरातून 587 तक्रारी आल्या आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आता शासनाच्या दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे महिलांवरील अत्याचारांमध्ये अधिकच भर पडण्याची भीती महिला संघटनांकडून ''लोकमत'' शी बोलताना व्यक्त करण्यात आली.
-------------------------------------------------------
दारूची दुकाने सुरू करायला परवानगी दिल्यामुळे अनेक अडचणी उद्भवणार आहेत. व्यसनमुक्ती केंद्रात आम्ही नवे रूग्ण घेत नाही. त्यामुळे आता या निर्णयामुळे दारू पिऊन ही लोक कुटुंबातील महिलांसह इतर सदस्यांना त्रास देणार आणि मग त्यांना केंद्रात ठेवण्याची सदस्यांकडूनच मागणी केली जाणार. कारण दारूडया व्यक्तीचे स्वत:वर नियंत्रण नसते. दारूमुळे त्यांची प्रतिकारशक्ती मंदावते. यातच घरगुती हिंसाचारामध्येही वाढ होणार हे देखील खरं आहे. यातच ह्यड्रंकन ड्राईव्हह्ण मुळे अपघात झाल्यास रूग्णालयांमध्ये रूग्णाला ठेवण्यासाठीही जागा नाही अशी परिस्थिती आहे. यामुळे हा निर्णय चुकीचा असून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा- डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
-------------------------------------------------------
दारू हा नेहमीच महिलांवरील हिंसेचा गंभीर विषय राहिला आहे. दारूसाठी पैशाचा तगादा लावणे आणि पत्नीने न दिल्यास तिला मारहाण करणे हे घडतच आले आहे. आम्ही एक सर्व्हे करीत आहोत. त्यामध्ये लॉक डाऊनच्या काळात व्यसनांचे काय करता? असा प्रश्न विचारण़्यात आला आहे. त्याचे उत्तर काय येते बघूयात. लॉक डाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प आहेत. आर्थिक चणचणी प्रत्येकाला भेडसावत आहे.त्यामुळे याकाळात महिलांना दोन्ही बाजूने सहनकरावे लागणार आहे. दारूडा व्यक्ती फिजिकल डिस्टन्सिंग कसे पाळू शकणार?दारू मिळविण्यासाठी मारामा-या सुरू होतील. दारू विक्रीमधून सरकारने महसूलमिळविण्याचा घेतलेल्या निर्णयातून अनेक प्रश्न निर्माण होतील. या निर्णयाला आमचा विरोध आहे. समाजस्वास्थ चांगलं राहण्याच्या दृष्टीने पावले उचलली जायला हवीत
- साधना दधिच, नारी समता मंच
------------------------------------------------------
दारू वाढली की हिंसा वाढते. आमच्याकडे महिला अत्याचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पण कोरोना काळात महिलांच्या प्रश्नांकडे कितपत लक्ष दिले जाणार? हा मुददा आहे. पोलिसांवरच कोरोनाचा इतका ताण आहे. त्यामुळे दादतरी कुणाकडे मागायची? अशा चक्रात आम्ही अडकलो आहोत. न्यायव्यवस्थेकडूनमहिलांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळणार का? कारण सध्या न्यायालये बंद आहेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे यात दुमत नाहीच. पण केंद्र सरकार राज्याला कोरोना काळात मदत करीत नाहीये. त्यामुळे राज्याला महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही- किरण मोघे, सामाजिक कार्यकर्त्या
-------------------------------------------------