Corona vaccination Pune : १ मे पासून खासगी रुग्णालयांना लस पुरवठा बंद; पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाच प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 05:42 PM2021-04-26T17:42:15+5:302021-04-26T18:45:26+5:30
महापौर मुरलीधर मोहोळ यांची महत्वपूर्ण घोषणा.
पुणे : पुणे शहरातल्या लसीकरणाचा गोंधळ अजुनही कायम आहे. कमी येत असलेल्या लसींमुळे आता १ तारखेपासुन सरसकट लसीकरण कसं करणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता मात्र पुणे महापालिकेने १ तारखेनंतर देखील ज्येष्ठ नागरिकांचेच प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे शहरांमध्ये लसीकरण मोहिमेने सुरुवातीला वेग घेतला होता. मात्र नंतर येणाऱ्या लसीची संख्या कमी झाल्याने अगदी थोड्या लोकांना लस मिळायला सुरुवात झाली होती. अपॅाईंटमेंट घेऊनही अनेक नागरिकांना स्टॅाक नसल्याने परत फिरावं लागत होतं. थेट वॉक इन लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या.
याच पार्श्वभूमीवर आता १ तारखेपासूूून १८ वर्षांच्या वरच्या नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. हे सुरु झाल्यानंतर दुसऱ्या डोसचे लसीकरण कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत सोमवारी(दि.२६) अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याविषयी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले “ २८ दिवसांत जवळपास ४ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापुढे लस कमी असल्याने प्राधान्याने १ तारखेनंतर १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरु होईल त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सरकारच्या आदेशानंतर १ तारखेनंतर खासगी रुग्णालयाला लस पुरवली जाणार नाही. त्यामुळे आता महापालिकेला आलेल्या सगळ्या लसी महापालिकेच्या केंद्रावर वापरली जातील “
दरम्यान, वैकुंठ आणि कैलास स्मशानभूमीमध्ये नवीन विद्युत दाहिनी बसवणार असल्याचेही महापौरांनी जाहीर केले. तसेच महापौर निधी मधून १०० नवीन व्हेंटिलेटर खरेदी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.