सरकारला देशात दंगली घडवायच्यात; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 08:00 AM2018-06-10T08:00:09+5:302018-06-10T08:00:09+5:30
हे सरकार किती स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आहे ते लवकरच उघड करेन.
पुणे: आगामी निवडणुका टाळण्यासाठी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण करता यावी, यासाठी सरकारला देशभरात दंगली घडवायच्या आहेत. किंबहुना तोच सरकारचा प्रमुख अजेंडा आहे, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या सातव्या पंचवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
देशातील विविध समूहांमध्ये अस्वस्थता पसरविण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. दंगल माजविणे हाच सरकारचा अजेंडा आहे. कारण दंगलीनंतर व्यवस्था कोलमडल्याच्या नावाखाली आणीबाणी लावून निवडणुका घेता येणार नाहीत, असे वातावरण तयार केले जाईल. मात्र, सरकारला दंगल करण्याची, जाळपोळ करण्याची संधीच मिळू देऊ नका. सत्ता हाती घेण्याचे ध्येय ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपल्यावर होत असलेल्या नक्षलवादाच्या आरोपांबाबत येत्या १३ जूनला मुंबईत उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशात आतापर्यंत हिंदू-मुस्लिम वाद भडकविण्यात आला. आता आरक्षणाच्या विरोधात रान पेटविण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते आरक्षणाविरोधात मोर्चे काढत आहेत, यज्ञ करत आहेत. सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही. कदाचित या प्रश्नावर दंगल माजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आताच्या संसदेत बहुमत नसल्याने वातावरण तापविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, या प्रकारांकडे दुर्लक्ष करून सरकारला दंगल घडविण्याची संधी मिळू देऊ नका. आगामी निवडणुकीत सत्ता हाती घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार किती स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आहे, याबद्दल एक गौप्यस्फोट करणार असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.