तरुणांना रोजगार न दिल्यास सरकारला घरी बसावे लागेल - सचिन अहिर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 04:30 AM2019-02-23T04:30:36+5:302019-02-23T04:30:55+5:30
राष्ट्रीय कामगार संघटनेचा कामगार मेळावा उत्साहात
आंबेठाण : पंचवीस कोटी सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सरकारने दोन लाख तरुणांनादेखील रोजगार दिला नाही, अशा सरकारला येणाºया लोकसभा निवडणुकीत कामगारांनी घरी बसवावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे (इंटक) संस्थापक-अध्यक्ष सचिन अहिर यांनी २३ व्या कामगार मेळाव्यात केले.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते, पुणे पीपल्स बँकेचे बबनराव भेगडे, कामगारनेते संजय कदम, विजय काळोखे, निवृत्ती देसाई, ईश्वर वाघ, राजन लाड, लक्ष्मण तुपे, उत्तम गीते, शिवाजी काळे, साई निकम, किशोर रहाटे, संतोष बेंद्रे, बाळासाहेब वाघ, संतोष म्हाळुंकर, संदीप गाडे, समीर बुट्टे-पाटील यांच्यासह चाकण औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांना, तसेच कामगारांना श्रद्धांजली अर्पण करून कामगार मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. सचिन अहिर यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले, की सत्तेवर असलेल्या सरकारने करोडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या वल्गना केल्या होत्या, मात्र दोन लाख तरुणांनाही रोजगार उपलब्ध केला नसल्याने या सरकारला सत्तेवरून कामगारांनी घरी बसवावे. नोटबंदीनतंर १४३ कारखाने बंद पडले. त्यामुळे उद्योजक नव्याने गुंतवणूक करण्यासाठी तयार नाहीत. चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ठेकेदारी जोमात सुरू असून, याकडे येथील लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम येथील सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. मात्र महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेच्या माध्यमातून कुठल्याही कामगारावर अन्याय होऊ देणार नाही. कामगारांनी संघटनेला गालबोट लागेल, असे काम करू नये.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.
बबनराव भेगडे यांनी सांगितले, की पुणे पीपल्स बँकेकडून कामगारांना दहा लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यावेळी संपादक काशिनाथ माटल यांचे मागोवा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गुणवंत कामगारांना सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब घाटे यांनी सूत्रसंचालन केले. समीर बुट्टे-पाटील यांनी आभार मानले.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदारीवर काम करणाºया असंघटित कामगारांचा प्रश्न लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच लूमॅक्स कंपनीतील ज्या कामगारांना अद्यापही कामावर कंपनी व्यवस्थापने घेतले नाही. त्यासंदर्भात कंपनीशी चर्चा करून तो प्रश्न सोडवला जाईल. संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. - सचिन अहिर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटना.