देहुतील सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार- डॉ.नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 09:54 AM2023-01-31T09:54:10+5:302023-01-31T09:55:02+5:30
तुकाराम महाराजांनी धार्मिक मार्गातून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखविला...
देहूगाव (पुणे) : आपल्या निष्ठेला तडा देण्याचं काम इतर शक्तींकडून होत आहे त्यासाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी धार्मिक मार्गातून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे. असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
पुण्यातील अॅड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशनच्या पुढाकारातून कैवल्य कथा या युट्युब चॅनेलवरील संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर आधारित तिसरं पुष्प म्हणजे "संत तुकाराम महाराजांच्या" गोष्टीचे अॅनिमेशन स्वरूपातील चलचित्राचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते आज देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरात करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पंढरपूर येथील विकासकामांसाठी बैठका घेत असताना मला मागील सरकारची खूप मदत झाली. यामुळे ७३ कोटी रुपये शासनाने जाहीर केली आहेत. त्याचप्रमाणे देहू येथील सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिलेल्या शिकवणी ८०% समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. आज संत तुकाराम महाराजांच्या चरणी “संत तुकाराम महाराजांच्या” गोष्टीरूप अॅनिमेशन चलचित्राचे उदघाटन झाले याचा मला आनंद होत आहे. हे अॅनिमेशन चलचित्र जास्तीत जास्त लोकांनी पाहावं, सोबतच त्याचं इंग्लिश, हिंदी मध्ये रूपांतरण व्हावं आणि दूरदर्शन, सह्याद्री वाहिनीवरून याचे प्रक्षेपण झालं पाहिजे यासाठी देखील डॉ. गोऱ्हे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लहान मुलांना अध्यात्माची गोडी लागावी, वारकरी सांप्रदायिक संतांच्या चरित्राची माहिती व्हावी, फाउंडेशनच्या वतीने कैवल्य कथा या युट्युब चॅनेलवर वारकरी संतांच्या आध्यात्मिक अॅनिमेटेड फिल्म तयार करण्यात आली आहे. मुलांच्या हातून मोबाईल सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने याच मोबाईलच्या माध्यमातून मुलांना अध्यात्माची गोडी लागावी याकरिता पुण्यातील अॅड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशनतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.