विनाअनुदानित प्राध्यापकांचा पगार सरकार देईल, तुम्ही विद्यार्थ्यांची फी कमी करा - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 08:19 PM2022-09-26T20:19:48+5:302022-09-26T20:34:45+5:30
प्राध्यापकांच्या वेतनासाठी राज्याचे सध्या बारा हजार कोटी रुपये खर्च होतात. त्यामध्ये आणि एक हजार कोटी वाढवून विनाअनुदानित प्राध्यापकांचे वेतन करू
पुणे : विनाअनुदानीत महाविद्यालयांच्या पगार आम्ही करू, तुम्ही विद्यार्थ्यांची फी कमी करण्यास तयार आहात का? असा प्रश्न वजा आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी केले.
पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या विविध महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांचे डिजिटल पध्दतीने उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण देणारे महाविद्यालय हे विद्यार्थ्यांकडू प्रचंड शुल्क घेतात या विषयावर ते बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले की, जो पर्यंत गुणवत्तेचे शिक्षण स्वस्त मिळत नाही. तोपर्यंत हे शिक्षण मर्यादित राहिल त्यामुळे उच्च शिक्षणाचे शुल्क अगदी कमी झाली पाहिजेत. मात्र महाविद्यालये फी कमी करत नाहीत. महाविद्यालय चालविण्याचा खर्च भागवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून फी घेण्यात येते. त्या खर्चामध्ये सर्वाधिक खर्च हा प्राध्यापकांच्या वेतनावर होतो असे महाविद्यालयांकडून दाखवले जाते. त्यामुळे त्या प्राध्यपाकांचा पगारच आम्ही करतो. प्राध्यापकांच्या वेतनासाठी राज्याचे सध्या बारा हजार कोटी रुपये खर्च होतात. त्यामध्ये आणि एक हजार कोटी वाढवून विनाअनुदानित प्राध्यापकांचे वेतन करू. मात्र संस्था विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्यास तयार आहेत का हे संस्थांनी सांगावे.