Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 05:48 PM2024-09-02T17:48:13+5:302024-09-02T17:50:14+5:30
लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा कल्याणकारी योजना हे सरकार राबवत आहे
भीमाशंकर: विकास व कल्याण याची सांगड घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. भीमाशंकराच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुखी समाधानी व आनंदी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या व पाचव्या श्रावणी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरददादा सोनवणे भीमाशंकर दर्शनासाठी आले होते.
वीस वर्षापासून दरवर्षी एकनाथ शिंदे भीमाशंकर दर्शनासाठी येत असतात. यावर्षी खराब हवामान असतानाही लांडेवाडी येथे हेलिकॉप्टरने येऊन पुढे भीमाशंकर दर्शनासाठी आले भीमाशंकर मध्ये दाट धुके व पावसाळी वातावरण होते. मंदिरात उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे यांच्या वेदपठणात मुख्यमंत्र्यांची पूजा पार पडली. त्यानंतर भीमाशंकर मधील सर्व ब्राह्मणांच्या उपस्थितीत पुण्यवचन झाले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कोदरे यांनी आराखड्या बाबत काही सूचना मांडल्या. भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना आंघोळीसाठी ज्ञानव्यपी कुंडाजवळ व्यवस्था व्हावी अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र देशात प्रगतीमध्ये सर्वात अग्रभागी असलेले राज्य आहे. या राज्यात आपण लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा कल्याणकारी योजना हे सरकार राबवत आहे. पुढील वर्षी श्रावण महिन्यात मुख्यमंत्री म्हणून येण्याची संधी जनतेचा व भीमाशंकर च्या आशीर्वाद असेल तर मिळेल. भीमाशंकर मध्ये भक्तांसाठी ज्या ज्या सुविधा करता येतील त्या सर्व सुविधा सुविधा केल्या जातील कुठे सरकार कमी पडणार नाही. भीमाशंकर विश्वस्त व ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. आढळराव एकनाथ शिंदे यांच्या कडे पुन्हा जाणार का असा प्रश्न मुख्यमंत्री यांना विचारला असता आढळराव पाटील कुठे असते तरी ते माझ्यासोबतच आहेत असे उत्तर त्यांनी दिले.