सहकार मोडीत काढण्याचा सरकारचा डाव : पवार
By admin | Published: January 10, 2017 02:23 AM2017-01-10T02:23:52+5:302017-01-10T02:23:52+5:30
‘‘देशात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री व सरकारमधील मंत्री खासदार यांना विचारात न घेता निर्णय घेतला. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे
कारेगाव : ‘‘देशात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री व सरकारमधील मंत्री खासदार यांना विचारात न घेता निर्णय घेतला. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे महंमद तुघलकी अवतार आहे. सहकार मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे,’’ असे मत शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.
न्हावरा फाटा (ता. शिरूर) येथे केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता पुणे-नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा युवक कॉँग्रेस अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बाजार समिती अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, तालुकाध्यक्ष रवी काळे, युवक अध्यक्ष कुंडलिक शितोळे, महिला अध्यक्ष विद्या भुजबळ, सदाशिव पवार, बाळासाहेब नागवडे अध्यक्ष, नगरसेवक जाकीरखान पठाण, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, नीलेश पवार, अमोल चव्हाण, दत्तात्रय हरगुडे, अनिल भुजबळ, लतिकाताई वराले, शंकर फराटे, बाळासाहेब भोर, शैलेश घाडगे, योगेश थोरात अजित इटनर, युवती राष्ट्रवादी काँग्रेस संगीता शेवाळे, अजय हिंगे, गिरीजा पाटील, बाळासाहेब ढमढेरे, दिलीप मोकाशी, रंगनाथ थोरात, श्रीनिवास घाडगे, पांडुरंग थोरात, जयसिंग कर्डिले, अँड. रवींद्र खाडरे, शिरीष लोळगे, पोपट दसगुडे, हाफीज बागवान, कलिम सय्यद, शिवाजीराव दरेकर, दिनकर पाडळे, हरिदास कर्डिले, सुरेश पाचर्णे उपस्थित होते.
पवार म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात भाजपाने जीएसटी विधेयकाला विरोध केला आणि आता तेच विधेयक मंजुरीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. आधार कार्डसाठी विरोध केला, परंतु आता त्याच आधारचा सरकार आधार घेत आहे. नोटाबंदीमुळे विविध पिकांचा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे.
शेतकऱ्यांनी शेतात कामे करायची की बँकेत रांगा लावायच्या, अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे. पेटीएमसारख्या परदेशी कंपनीला दररोज शेकडो कोटी रुपयांचा नफा होत आहे. (वार्ताहर)