रिंग रोडच्या नावाखाली भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा सरकारचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:20 AM2021-02-06T04:20:11+5:302021-02-06T04:20:11+5:30
--- पानशेत : रिंगरोडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून त्यांना भूमीहीन करण्याचा डाव सरकारचा आहे तो त्यांनी मागे घ्यावा ...
---
पानशेत : रिंगरोडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून त्यांना भूमीहीन करण्याचा डाव सरकारचा आहे तो त्यांनी मागे घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांना सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन छेडावे लागेल असे प्रतिपादन आज शेतकरी रिंगरोड विरोधी कृती समितीच्या वतीने अतुल पवळे यांनी केले.
रिंगरोडला विरोध करण्यासाठी आज पानशेत परिसरातील शेतकऱ्यांनी मुळशी तालुक्याचे नायब तहसीलदार सुखदेव दांडगे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी दामाजी शेजवळ, विनोद मानकर, शिवाजी शेजवळ, गणेश मानकर, शिवाजी मानकर यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पुणे शहराला लागूनच मुळशी, हवेली, वेल्हा, भोर तालुक्यातून रिंग रोडचे सरकारचे नियोजन अत्यंत चुकीचे आहे. एकीकडे अवाढव्य खर्च व एकीकडे शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा सरकारचा चुकीचा प्रयत्न आहे.या कामात कोणतेच नियोजन दिसत नाही. बहुतेक शेतकरऱ्यांच्या संपूर्ण जमिनी रिंग रोडमध्ये लादल्या जात आहे. सरकार मात्र त्या कवडीमोल भावात खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात हडपण्याचा सरकारचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही.
सरकारी निविदा तुलनेने अतिशय कमी खपाच्या वृत्तपत्रात देण्यामागे सरकारचा एकच हेतू आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना याची माहिती मिळून नये आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने भूसंपादन करता यावे. एकीकडे शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवायची व दुसरीकडे मात्र त्यांचा गळा दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न करायचा ही भूमिका दुटप्पी पणाची आहे. हा रिंग रोड म्हणजे विकास नसून शेतकऱ्यांच्या गळ्यात टाकलेला गळफास आहे
--
फोटो - ०५ पानशेत शेतकरी निवेदन
रिंग रोडला विरोध करणारे निवेदन नायब तहसीलदारांना देताना पानशेत परिसरातील शेतकरी