शासनाचा पालिकेला ‘धक्का’
By admin | Published: February 19, 2016 01:21 AM2016-02-19T01:21:48+5:302016-02-19T01:21:48+5:30
शासनाकडून मुद्रांक शुल्कासोबत अतिरिक्त अधिभारापोटी महापालिकेला दिल्या जाणाऱ्या अनुदानात शासनाकडून कपात करण्यात आली आहे
पिंपरी : शासनाकडून मुद्रांक शुल्कासोबत अतिरिक्त अधिभारापोटी महापालिकेला दिल्या जाणाऱ्या अनुदानात शासनाकडून कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला नऊ कोटींचा फटका बसणार आहे.
महापालिकांना मुद्रांक शुल्कासोबत अतिरिक्त एक टक्का अधिभारामुळे जमा होणाऱ्या रकमांचे शासनाकडून वितरण केले जाते. त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेला २६ कोटी ४४ लाख ११ हजार ४२० इतकी रक्कम देणे अपेक्षित होते. मात्र, शासनाकडून यापैकी केवळ १७ कोटी ५१ लाख ९६ हजार ५५४ इतकीच रक्कम दिली जाणार आहे. यामुळे एलबीटीच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या कपातीपाठोपाठ आता मुद्रांक अधिभारापोटी मिळणाऱ्या रकमेतही कपात करण्यात आल्याने महापालिकेला पुन्हा एक ‘धक्का’ बसला आहे. छोट्या व्यापाऱ्यांची एलबीटी बंद करून केवळ ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांनाच एलबीटी आकारला जाऊ लागला. दरम्यान, एलबीटीच्या बदल्यात महापालिकेला दरमहा ६६ कोटी ४८ लाख अनुदान मिळत होते. मात्र, त्यातही कपात केल्याने जानेवारी महिन्यात ४७ कोटी ३५ लाख अनुदान मिळाले, तर फेबु्रवारीत केवळ ४२ कोटी ८१ लाख रुपये अनुदान मिळाले. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात कपातच होत चालली आहे.
दरम्यान, पालिका प्रशासन जमा आणि खर्चाची जुळवाजुळव करीत असून, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासह शासनाच्या अनुदानातून महापालिकेचा गाडा हाकला जातो. मात्र, अनुदानातही कपात करण्याचा धडाका शासनाने लावला आहे. (प्रतिनिधी)