Upsc: राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त मृणाली जोशीला राज्यपालांकडून 'विठ्ठलाची' मूर्ती भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 09:14 PM2021-10-06T21:14:49+5:302021-10-06T21:15:19+5:30
मृणालीने आई वडिलांसह राज्यपालांची राजभवन पुणे येथे भेट घेतली.
पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या मृणाली जोशीचे पेढा भरवून कौतुक केले. राज्यपालांनी मृणालीला विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मृणालीने आई वडिलांसह राज्यपालांची बुधवारी राजभवन पुणे येथे भेट घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मुख्य परीक्षेचा निकालात ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. यामध्ये नागपूरच्या मृणाली जोशीने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर देशात ३६ वा क्रमांक मिळवला आहे.
मृणाली आता २४ वर्षांची असून विशेष म्हणजे तिने दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले आहे. मृणालीने तिचे बारावीपर्यतचे शिक्षण अभिनव विद्यालयातून तर बीए (ईकॉनॉमिक्स) फर्ग्युसन महाविद्यालयातून २०१८ मध्ये पूर्ण केले.
''वाचन, लिखाण, चित्रकला, स्वअभ्यास अशा छंदांमुळे यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवता आले. माझ्या आई-वडिलांनी मला माझ्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी दिल्याने आज सनदी अधिकारी म्हणून लोकसेवा करायची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया मृणालीने दिली आहे.''